आर्थिक परिस्थिती बेताची तरीही आभाळाएवढे मन ... 

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दररोज जेवणाचे १०० डबे  मोफत वाटप 
 
आर्थिक परिस्थिती बेताची तरीही आभाळाएवढे मन ...
कोरोना काळात कसबे तडवळेच्या अंबिका वाघमारे आणि तिच्या तीन मुलींचा स्त्युत्य उपक्रम  

उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक लॉकडाऊन सुरु असल्याने हॉटेल बंद आहेत, त्यामुळे कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची उपासमार होत आहे.मात्र कसबे तडवळे येथील वाघमारे कुटुंबातील माय आणि तिच्या तीन लेकी दररोज जिल्हा रुग्णालयामधील  १०० रुग्णांच्या नातेवाईकांची भूक भागवत आहेत. विशेष म्हणजे दररोज लागणारा स्वयंपाक हा स्वतः करत आहेत आणि  कसबे तडवळे ते उस्मानाबाद हे २५ किलोमीटरचे अंतर बाईकवरून कापून अन्नदान करीत आहेत.  

 उस्मानाबाद येथील शासकिय रुग्णालयात  अनेक गोर - गरीब रुग्ण कोरोनाने बाधित होऊन उपचार घेत आहेत.  शासकीय रुग्णालयात ऍडमिट होणारे रुग्ण हे बहुतेक करून आर्थिक परिस्थिती बेताची असलेले व लांब खेडेगावातून आलेले असतात. त्याच्याबरोबर आलेले नातेवाईक रुग्णलयाबाहेर ताटकळत थांबतात, गावाकडून येणारे वाहने बंद आणि शहरातील हॉटेल, खानावळ बंद आहेत . त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यांची भूक भागवण्यासाठी कसबे तडवळे येथील वाघमारे कुटुंबातील माय आणि तिच्या तीन लेकी पुढे सरसावल्या आहेत. 

     कसबे तडवळे येथील अंबिका वाघमारे यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच.  पतीच्या निधनानंतर तीन मुलीचा संभाळ चप्पल - बुट विक्रीचा व्यवसाय करत केला. या कोरोनाच्या लाँकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील डोक्यात विचार आले की, वडील अजारी आसताना दवाखान्यात राहत होतो, त्यावेळी पाणी पिऊन दिवस काढले.  एक वेळेसच्या जेवणासाठी तरसत होतो.  खुप हाल झाले. आपल्यावर जी परिस्थिती  ओढवली होती ती परिस्थिती  आज अनेक  कुटुंबावर ओढवली आहे. त्यांना मदतीचा हात देण्याची कल्पना अंबिका वाघमारे यांना सुचली आणि त्याला साथ दिली तिच्या तीन लेकी. 

 
आपल्याला  कोणी आधार दिला नाही परंतु आपण कोणाला तरी आधार द्यायला पाहीजे, या भावनेने अंबिका वाघमारे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना एकवेळेस जेवण देण्याचा निश्चय केला  व आपली कल्पना आपल्या तुम्ही  मुली माया,मनिषा व तेजल यांना सांगितली. मुलीनी ही तात्काळ आईच्या कल्पनेला पाठीबा दिला एवढेच नाही तर  या तिन्ही मुलींनी बचत करुन ठेवलेले पैसे तात्काळ आईला दिले व आवश्यक असलेला किराणा भरण्यास सांगितले 

गेल्या सहा  दिवसापासुन उस्मानाबाद येथील  शासकिय रुग्णालयाच्या परिसरातील  रुग्णाच्या नातेवाईकाना मनिषा वाघमारे व तेजल वाघमारे या दोन्ही बहीनी दोन चपाती व भाजी आसा एकवेळेसचा डब्बा नेवून देत आहेत. दररोज १०० जणांना  जेवन दिल जाते. दररोज मोठ्या प्रमाणात स्वयंपाककरावा लागतो. दोनशे चपात्या व त्याला पुरेसी भाजी करावी लागते,  बाहेरुन आचारी मार्फत करावे तर त्याला पैसे द्यावे लागतात, माञ आचऱ्याला  देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून  या  माय- लेकी भल्या पहाटेच उठुन स्वतः स्वयपाक करतात व सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व डब्बे भरुन तयार ठेवतात व नंतर मनिषा व तेजल या दोघी बहीनी उस्मानाबाद येथे जाऊन शासकिय रुग्णालयासमोरील नातेवाईकांना आत्यंत आपुलकी रुग्णाच्या प्रकृतीची चौकशी करत डबा हातात देतात.  

 समाजामध्ये खूप गर्भश्रीमंत लोक आहेत माञ एकजण ही अशा विधायक कामासाठी पुढे येत नाही. माञ आर्थिक परिस्थिती  बेताची असलेल्या  कसबे तडवळच्या निराधार माय आणि तिच्या तीन लेखी  आज उस्मानाबादच्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या एक वेळेसच्या भुकेचा आधार बनत आहेत, त्यांच्या कार्याला उस्मानाबादला लाइव्हचा सलाम !

Video

From around the web