मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी स्वाभिमानीने पेटविली आंदोलनाची मशाल !
उस्मानाबाद - कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत मराठवाड्याच्या हक्काच्या 23.66 टीएमसी पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने क्रांतिदिनाचे औचित्य साधून आंदोलनाची मशाल पेटविली आहे. सोमवारी (दि.9) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या नेतृत्वात उस्मानाबाद शहरात मशाल फेरी काढून मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्यांमार्फत मागणीचे निवेदन देण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मशाल फेरीला सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करून बस स्थानक, जिल्हा न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही फेरी काढण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे काम सन 2010-11 पासून 23.66 टीएमसी पाणी उपलब्धतप्रमाणे सुरू करण्यात आलेले ह ोते. त्यामुळे मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यातील 5 लाख 58 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते. परंतु 19 मार्च 2018 रोजी महाराष्ट्र शासनाने 5 टीएमसी पाणी उपलब्धतेप्रमाणे काम करण्यात यावे असे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी वापराची गरज पूर्ण होत नाही. उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये दुसरीकडून पाणी येण्यासाठी कोणत्याही नदीचा प्रवाह जात नसल्यामुळे या भागावर कायमस्वरूपी दुष्काळी शिक्का बसला जाईल. देशातील मागास जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचा समावेश असून सतत पाण्याचे टँकर, चारा छावण्या आणि रेल्वेने पाणी आणण्याची वेळ या भागांवर आली आहे.
लवादाच्या निर्णयाप्रमाणे कृष्णा खोर्यातून पाणी उपलब्ध नसल्याचे कारण देत पाणी कमी करण्यात आले आहे. परंतु कोयना धरणातून कोकणात विद्युत निर्मितीसाठी बरेच पाणी जात असून कोकण भागातून हे पाणी समुद्रात जाते. ते पाणी वळवून 23.66 पाणी उपलब्धतेप्रमाणे काम करणे शक्य आहे. त्यासाठी लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विष्णूदास काळे, विधिज्ञ आघाडीचे अॅड. विजय जाधव यांच्यासह चंद्रकांत समुद्रे, कमलाकर पवार, ज्ञानेश्वर शिंदे, धर्मराज पाटील, पंकेश पाटील, बालाजी शिंदे, मधुकर मायंदे, अमृत भोरे, राजेंद्र हाके आदींची स्वाक्षरी आहे.