इनामी जमीन खरेदी फेरफार रद्दचा उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्णय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून कायम

ढोकी येथील जामा मस्जिद देवस्थान मालकीची २१ हेक्टर इनामी जमीन बेकायदेशीर खरेदी प्रकरण
 
s
संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही होणार

ढोकी -  येथील जामा मस्जिद मालकीच्या इनामी जमिन खरेदी फेरफार क्रं.७९५ रद्दचा मा.उपविभागीय अधिकारी यांचा निर्णय.अप्पर जिल्हाधिकारी यांनी  कायम ठेवत इनामी जमीन खरेदीदार बुऱ्हानोद्दीन काझी यांचे अपील नामंजूर केले आहे. या निर्णयामुळे इनामी जमीन खरेदी करणाऱ्यास मोठी चपराक बसली आहे.  

या प्रकरणी अधिक माहिती अशी कि, ढोकी ता.उस्मानाबाद येथील जामा मस्जिद देवस्थान मालकीची इनामी जमीन गट नंबर ९६ क्षेत्र २१ हेक्टर ६१ आर हि वक्फ अधिनियम १९९५ कलम ३६ नुसार वक्फ बोर्ड, औरंगाबाद येथे नोंदणीकृत आहे. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २७ मार्च १९८० चैत्र ७, १९०२ यास संबंधित इनाम जमिनीची नोंदी आहेत. असे असतानाही ढोकी येथील बुऱ्हानोद्दीन काझी यांनी तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून वक्फ बोर्ड अथवा शासनाची पूर्वपरवानगी न घेता इनामी जमीन बेकायदेशीर पणे स्वतःच्या नावे करून घेतली होती.

सदरील प्रकरणात बेकायदेशीर खरेदी झालेचे लक्षात आल्यानंतर सदरील इनामी जमिनीचे वंश परंपरागत इनामदार असलेले वाजीद खुद्दुस काझी यांनी इनामी जमीन खरेदी फेरफार क्र.७९५ रद्द करून जमीन जामा मस्जिदच्या नावे करणेबाबत .उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे अपील दाखल केले होते. सर्व बाबींचा विचार करून उपविभागीय अधिकारी यांनी दि.१९/०८/२०१९ रोजी बेकायदेशीर खरेदी फेरफार क्र ७९५ रद्द केले. इनामी जमिनीचे बेकायदेशीर खरेदी विक्री झालेली असल्याने संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे जिल्हा वक्फ अधिकारी यांना आदेशित केले होते. तसेच तहसीलदार उस्मानाबाद यांना जामा मस्जिद, ढोकी संदर्भात जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण व्यवहार झालेले असतील तर त्याबाबत सखोल चौकशी करून अशी प्रकरणे शासन परिपत्रक क्र.डिईव्ही-२०१५/प्र.क्र.१५१/ज-१अ दि.०६ नोव्हेंबर २०१८ अन्वये दाखल करण्यात यावीत असे आदेशित केले होते. या निर्णयाच्या नाराजीने इनामी जमीन खरेदीदार बुऱ्हानोद्दिन काझी यांनी .अप्पर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे अपील दाखल केले होते.  

 
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सदरील प्रकरणाची सुनावणी झाली. जमीन सर्व्हे नं. ३८, ३९ चा गट नंबर ९६ ही इनामी जमीन असल्याचे गाव नमुना नं.९ वरून दिसून येत असल्याने, पीठासीन अधिकारी महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरण यांच्या सूट नंबर 40/ 2007 च्या दिनांक 15/ 6/ 2011 च्या आदेशात सदरची जमीन ही जामा मस्जिद, ढोकी यांची असून सदर जमीन महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 27 मार्च 1980 अन्वये इनाम जमीन म्हणून नोंद असून सदर जमीन ही वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. सदर जमीन ही वक्फ प्रॉपर्टी असल्यामुळे सदर जमीन ही जामा मस्जिद, ढोकी यांचे मालकीची असून सदर जमीन ही कोणालाही हस्तांतरित करता येत नाही. 

मुतवल्ली यांना सुद्धा सदरची जमीन विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा कोणताही अधिकार नाही. असे असताना सुद्धा सदर जमिनी चा विक्री व्यवहार करण्यात आलेला आहे. प्रकरणात वक्फ बोर्ड, औरंगाबाद यांनी सदरची जमीन ही जामा मस्जिद, ढोकी यांचे मालकीची असून वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे आदेश क्रमांक सुट नंबर 40/ 2017 मध्ये दिलेले आहे. व सदर चे आदेश हे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी CIV. R. A. NO. 185/ 2011 दिनांक 11 नोव्हेंबर 2011 अन्वये कायम ठेवलेले आहे. महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक डिईव्ही 2015 / प्र.क्र. 151/ ज-1 अ दिनांक 6 नोव्हेंबर 2018 अन्वये राज्यातील देवस्थान जमिनी ची तपासणी करून सदर जमीन या बेकायदेशीर रीत्या हस्तांतरित झाल्या असल्यास पूर्ववत देवस्थानच्या नावे करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. सबब वरील सर्व बाबींचा विचार करता उपविभागीय अधिकारी यांचे आदेशामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगत रूपाली आवले- डंबे मा.अप्पर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी दि.१०/०१/२०२२ रोजी आदेश पारित करत अपिलार्थी बुऱ्हानोद्दीन काझी यांचे अपील नामंजूर करून उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांचा आदेश दिनांक 19/08/ 2019 हा कायम ठेवला आहे. रिस्पॉडेंट वाजीद खुददुस काझी यांच्यावतीने अँड. फेरोज ई.शेख यांनी बाजू मांडली.  

From around the web