सुल्तानी संकटाचे फतवाधारी प्रशासनाला सोयर ना सुतक

तळ हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांचे प्रचंड हाल
 
सुल्तानी संकटाचे फतवाधारी प्रशासनाला सोयर ना सुतक

उस्मानाबाद -  अख्ख्या जिल्ह्याला कोरोना विषाणूंच्या संसर्गाने विळखा घातलेला आहे. अशा महामारीच्या अस्मानी व सुल्तानी संकटाच्या काळात ज्यांचे तळहातावर पोट आहे.‌‌ अशा कुटुंबातील व्यक्तींनी जगायचे कसे ? हा फार मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. मात्र आदेशवजा फतवाधारी जिल्हा प्रशासन अशा कुटुंबाना जगवायचे कसे ? याचा कुठेही विचार करताना दिसून येत नाही. कारण दररोज काहीतरी वेगवेगळे आदेशरुपी फतवे काढून कोरोना संसर्गाचे नाव पुढे करून कुठल्याही प्रकार जनतेच्या प्रश्नांची जाणीव नसलेल्या व्यापारी संघटनेचे ऐकून आदेश काढण्यात मश्गुल आहे. परंतू आदेश काढताना सर्वसामान्य जनतेची किमान पोटाची खळगी कशी भरेल ? याचि त्या फतव्यामध्ये कुठेही साधा विचार केलेला दिसून येत नाही हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल. 

जनता कर्फ्यूचा अर्थ असा नाही की जनता उपाशी पोटी मरेल. प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा म्हणजे काय ? जनतेला काय हवे आहे ? याचा त्यामध्ये कसल्याही प्रकारचा नामोल्लेख देखील नाही. तर त्यामध्ये फक्त आणि फक्त औषधी दुकाने चालू राहतील.  गोरगरीब जनतेने काय फक्त औषधे खाऊन जगायचे काय ? एक वेळ औषधे देखील खरेदी केली जातील. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला पैसा कुठून आणायचा ? कारण हाताला काम नसल्यामुळे दाम मिळणार कसा ?  त्यामुळे हे नवीन 'फतवाधारी' संकट इलाजापेक्षा महाभयंकर ठरू लागले आहे. जनता कर्फ्यूमुळे कोरोना संसर्गाला आळा जरूर बसेल. परंतू रुग्णांच्या आकडेवारीमध्ये कोरोना फक्त दिसेल. कारण जनता कर्फ्यूमुळे आकडेवारीत तफावत दिसू शकते. परंतू गोरगरिबांचे हाल त्यातून दिसणार नाहीत. 

एकीकडे माणसे जीवंत असून मेल्यागत दिसत आहेत. तर दुसरीकडे राहिलेल्यांचे जीव प्रशासनाच्या आदेशामुळे जात आहेत. जनता कर्फ्यू असल्यामुळे कुटुंबांती लहान मुलांना लागणारे दूध सुद्धा या प्रशासनाने बंद केल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तसेच भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाला शेतामध्येच सडू लागल्याने तो अक्षरशः रडकुंडीला आला आहे. परंतू त्याचे रडू फतवाधारी प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली असल्यामुळे ते दिसून येत नाही. तर एक महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने किराणा दुकान वगळता इतर सर्व दुकानातील मालही उंदीर व घुसींनी फस्त करण्यास सुरुवात केली आहे.  

अनेकांनी बँक व मायक्रोफायनान्स  यांच्याकडून कर्ज घेतलेले आहे. मात्र हाताला काम नसल्यामुळे ते कर्जाचे हप्ते फेडू शकत नाहीत. त्यामुळे बँक कर्ज वसुलीच्या हप्त्यासाठी घरासमोर चकरा मारत आहेत. व मायक्रो फायनान्सची मंडळी कुटुंबांना त्रास देत असेल याच्यावर प्रशासनाने कोणताही आदेश काढलेला दिसत नाही किंवा त्यांना सूचना सुद्धा दिलेल्या नाहीत. या सर्व बारीक बारीक गोष्टीचा प्रशासनाने अभ्यास करून योग्य नियोजन करून जनतेला न्याय द्यावा, असा आर्त टाहो जनता फोडीत आहे.

From around the web