अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सात वर्षांची सक्तमजुरी

 
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सात वर्षांची सक्तमजुरी

उस्मानाबाद - शाळेच्या गेटवरून पळवून नेऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास ७ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा उस्मानाबादच्या तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. सोमवारी (दि.२१) या खटल्याचा निकाल देण्यात आला.

यासंदर्भात शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले की, १७ मार्च २०१८ रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलगी शाळेतून मैत्रीणीसोबत घरी येत असताना आश्रुबा उर्फ अशोक रामलिंग डोके (वय २३, रा. सातेफळ, ता.कळंब) याने तिला तु माझ्यासोबत आली नाहीस तर तुझ्या बहिणीला मारून टाकीन, अशी धमकी देत पळवून नेले. त्यानंतर पुणे येथे रूमवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. 

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संतोष माने यांनी तपास केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीश श्रीमती आर. जे. राय यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सदर प्रकरणात १७ साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणात मुलीच्या शाळेचे मुख्याध्यापक, पीडित मुलगी, तिची मैत्रीण, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सदर प्रकरणातील समोर आलेला पुरावा, साक्ष आणि शासकीय अभियोक्ता सूर्यवंशी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी आश्रुबा उर्फ अशाेक डोके याला ७ वर्षांची सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

From around the web