गळ्यातील सोनसाखळी मोडून घेतले कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 

वाढदिवसानिमित्त भाजयुमोर्चाच्या देवकन्या गाडे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी 
 
गळ्यातील सोनसाखळी मोडून घेतले कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

उस्मानाबाद - भाजयुमोर्चा जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे यांनी गळ्यातील सोनसाखळी मोडून व वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन घेतले आहे. त्याच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. 

 भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती जिल्हा सरचिटणीस देवकन्या परमेश्वर गाडे यांचे लहान बंधू अशोक यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्या पैशाने त्यांनी कोरोना रूग्णांना सेवा देण्यासाठी आॅक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन घेतली असून ते मशीन जिल्ह्यातील कोरोना रूग्णांना देण्यात येणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील अनेक रूग्णांना होणार आहे. 

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष  राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते कोरोना रूग्णाच्या नातेवाईक रमण सुरवसे यांना मशीन सुपुर्द केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे, खंडु राऊत यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेकांचा मृत्यू देखील होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक जबाबदारीचे भान असलेल्या व सतत समाजकार्यात अग्रेसर असलेल्या देवकन्या गाडी यांनी खऱ्या अर्थाने या रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी वाढदिवसाचा अनाठायी खर्चाला फाटा देत कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी केल्या आहेत. गाडे यांच्या सारखे सामाजिक उपक्रम इतरांनी राबविणे आवश्यक ठरले आहे.

From around the web