वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीत न मांडल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडणार - आ. राणाजगजितसिंह पाटील

 
वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीत न मांडल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडणार - आ. राणाजगजितसिंह पाटील


 उस्मानाबाद - उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे बाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे पाठविण्याचा विषय अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारकडून जाणून बुजून या विषयाकडे दुर्लक्ष होत असून येणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयाला मंजूरी देवून प्रस्ताव केंद्राकडे न पाठविल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन झेडण्याचा इशारा आ. राणाजगजितसिंहजी पाटील  यांनी दिला आहे.

            जिल्ह्यातील रुग्णांना वेळेत व मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, तसेच येथील अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मागील भारतीय जनता पार्टी सरकारने उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सुरू करण्यास मान्यता दिली होती. या अनुषंगाने तज्ञ समिती गठीत करून त्यांचा अहवाल देखील शासनाकडे सादर करण्यात आला होता. परंतु त्यानंतर सरकार बदलल्याने ही प्रक्रिया स्थिरावली.

            दि. २९ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्राच्या अर्थ विषय कॅबिनेट समितीने ज्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय नाही व जिल्हा रुग्णालयाला सलग्न करता येणे शक्य आहे, अशा ठिकाणी ७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजूरी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व महाविद्यालये २०२१-२२ पर्यन्त सुरू करण्याचा संकल्प आहे. या सुस्पष्ट निकषामुळे उस्मानाबादचा यामध्ये निश्चित समावेश होते, हे वारंवार राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्ष केले जाते, प्रस्तावच मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जात नाही.

            राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे याबाबत वारंवार मागणी केली, अधिवेशनामध्ये विषय मांडला, परंतु हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जात नाही. दि.२६ जून रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, तेव्हा देखील उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसह केंद्राकडे पाठविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी च्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेवून केली होती. ना.अमित देशमुख साहेबांनी येत्या १५ दिवसात प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते, तसेच पत्रकार परिषदेमध्ये जाहीरही केले होते. त्याचप्रमाणे दि. २६ ऑगस्ट रोजी देखील या विषयावर बैठक झाल्याचे ना. अमितजी देशमुख यांनी ट्विट करत प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवण्याचे आदेशीत केल्याचे संगितले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या पहिल्या घोषणेला ७५ दिवसांचा कालावधी लोटून गेला व दुसर्‍या घोषणे नंतर मंत्रिमंडळाच्या २ बैठका झाल्या तरी देखील एकाही बैठकीमध्ये हा विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आला नाही.

            कोवीड महामारीच्या काळात वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांचे व नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत. केवळ ३०% डॉक्टर कर्मचारी  संख्येवर रुग्णालये चालविली जात आहेत. या पार्श्व भूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटिकरण आवश्यक असताना या बाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारची उस्मानाबाद प्रती असंवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून येत असून सरकार स्थापनेला वर्ष होत आले तरी देखील वैद्यकीय महाविद्यालयचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आलेला नाही. केंद्राच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातून ७ महाविद्यालयाचे प्रस्ताव पाठविणे अपेक्षित होते, यातील काही प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. मात्र उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा व इमारत उपलब्ध असून देखील उस्मानाबाद चा प्रस्ताव आजवर प्रलंबित आहे.

                         त्यामुळे शिवसेनेला भरभरून देणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्याप्रती राज्य सरकारची ही अनास्था निषेधार्य असून आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयाला मंजूरी देवून प्रस्ताव केंद्राकडे न पाठविल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. राणाजगजितसिंहजी पाटील  यांनी दिला आहे.

From around the web