उद्योग बुडविणार्‍यांनी उद्योग उभारण्याविषयी सल्ले देऊ नयेत - खासदार ओमराजे निंबाळकर

 
 कौडगाव  एम.आय.डी.सी बाबत निर्णय झाले असतील तर माहिती द्यावी -  आ.राणाजगजीतसिंह पाटील 

उद्योग बुडविणार्‍यांनी उद्योग उभारण्याविषयी सल्ले देऊ नयेत - खासदार ओमराजे निंबाळकर


उस्मानाबाद  - मुख्यमंत्री व उद्योगमंत्री सक्षम आहेत. ते  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने विविध प्रश्नासंदर्भात बैठका घेत आहेत, त्यामुळे उद्योग बुडविणार्‍यांनी उद्योग उभारणीचे सल्ले देऊ नयेत असा टोला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विरोधकांना लगावला आहे. दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्रकाला  आ.राणाजगजीतसिंह पाटील  यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

तुमच्या आजवरच्या कारकिर्दीचा आलेख जनतेला ज्ञात आहे. तुमचा शहाजोगपणा जनतेच्या चांगलाच लक्षात आला आहे. जिल्ह्याच्या विकासांची तुम्ही चिंता करु नका व मुख्यमंत्र्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडु नका. उद्योग विषयावर बैठक लावण्याची विनंती करण्याअगोदर आमदारांनी थोडी माहिती घ्यायला हवी होती. उद्योगमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याच्या उद्योगाच्या प्रश्नासंबंधी बैठक पार पडली असुन त्यामध्ये  सविस्तर चर्चा देखील झाली आहे. यानंतर खास तुमच्यासाठी बैठक आयोजीत करण्याची तुमची मागणी हा  निव्वळ 'विनोद'च मानला पाहिजे. आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री आहेत म्हणुनच तर आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी ही बैठक बोलावली. त्यामुळं जिल्ह्याकडे त्यांनी लक्ष द्यावे असला शहाजोगपणा यापुढे बंद करावा असाही इशारा खासदार राजेनिंबाळकर यानी विरोधकांना दिला.


 तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करावी आमच्या नेतृत्वानी काय करावे एवढी तुमची पात्रता नाही हे सुध्दा लक्षात ठेवावे. नुसतं पत्रक काढुन व पोकळ विकासाच्या गोष्टी करुन जिल्ह्याचे चित्र बदलणार असते तर मागेच तुमच्या निवेदनाच्या पत्रावळ्या वरुन जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलुन गेला असता. या जिल्ह्यावर मागासचा शिक्का ज्यांच्यामुळं बसलाय तेच आता नव्याने विकासांच्या बाबतीत बोलतायेत यापेक्षा हास्यास्पद काय असावे.

विषयच काढला म्हणुन मी जनतेला सांगतो की, जिल्ह्याच्या विविध प्रश्नासंबंधी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने व पर्यटनमंत्री यांच्या पुढाकाराने बैठका घेऊन त्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी समोर आलेल्या अडचणीची सोडवणुक करण्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रयत्न देखील सुरु केले आहेत. पण आम्हाला नुसते पत्रक काढुन गाजावाजा करायची सवय नाही. जे काय होतय ते आमच्यामुळेच असला स्वभावही आमचा नाही पण विकासांच्या बाबतीत आमचं सरकार कटिबध्द असुन योग्य दिशेन काम करत आहे असा विश्वास खासदार राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.

  कौडगाव  एम.आय.डी.सी बाबत निर्णय झाले असतील तर माहिती द्यावी -  आ.राणाजगजीतसिंह पाटील 

उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती  व्हावी यासाठी कौडगाव एम.आय.डी.सी विकासाचा विषय मी सुरू केला होता. व तो जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, गेली ६ वर्ष यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करून देखील शिवसेनेचे उद्योगमंत्री असलेल्या ना.सुभाष देसाई साहेबांनी यासाठी कांहीही केली नाही हे वास्तव आहे. मोघम पत्रकबाजी करण्यापेक्षा एकेकाळी तेरणा कारखान्याचे सर्वेसर्वा असणारे व ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याची अधोगती झाली ते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या कथित बैठकांत कौडगाव  एम.आय.डी.सी बाबत चर्चा व कांही निर्णय झाले असतील तर जरूर जनतेसमोर मांडावेत, या प्रकल्पासाठी मदत करणं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी जरूर कराव. त्यासाठी त्यांना आमच्या अनेक शुभेच्छा.

- आ.राणाजगजीतसिंह पाटील 

From around the web