कळंब पोलीस स्टेशनमधील २१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

 
कळंब पोलीस स्टेशनमधील २१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा


कळंब ( विशाल कुंभार ) - कोरोनाशी चार हात करण्यासाठी स्वतःच्या  आरोग्याचा विचार न करता खाकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उभे राहुन नागरिक व कोरोना मध्ये तटस्थ भिंतींचे काम करत आहेत. अखेर या तटस्थ भितींला कोरोनाची लागण झाली असून  कळंब पोलीस ठाण्यातील एकूण  २१  पोलिस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.

    कोरोनाला रोखण्यासाठी महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व नगर पालिका हे चार घटक महत्वाची भूमिका बजावत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासने पोलीस प्रशासन रस्त्यावर अहोरात्र काम करत आहेत. तसेच सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क न लावणे यासह विविध कार्यवाही करुन पोलीस प्रशासन लोकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे या लोकांचा दररोज अनेक लोकांसोबत संपर्क येत आहे.

कळंब पोलीस ठाण्यातील ७९ कर्मचारी व चार अधिकारी असे एकूण ८३ जणावर ठाण्यातंर्गत २६ गावे व कळंब शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा भार आहे. सध्या गणपती उत्सव कालावधी आहे. त्यामुळे गावा गावात गणेश उत्सव लहान मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची जवाबदारी ही पोलीस प्रशासनावर येते. मात्र गेल्या कांही दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल २१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढणार आहे.

शहरात अजूनही सोशल डिस्टन्स न पाळणे व मास्क न वापरणारे नागरिक दिसतात. त्यामुळे अजून नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

From around the web