कोरोना नियंत्रणात आणण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी - ॲड रेवण भोसले

 
कोरोना नियंत्रणात आणण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी - ॲड रेवण भोसले

उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू करण्यात आलेली आहे परंतु महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट मत जनता दल सेक्युलर चे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

देशात इतर राज्य सरकारांनी केंद्र सरकारने लॉक डाऊन संदर्भात लागू केलेल्या सर्व नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोना विषाणूचे रुग्ण कमी करण्यात यश मिळविले आहे. महाराष्ट्रात मात्र कोरोना विषाणूचे रुग्ण कमी करण्याकडे अधिक लक्ष देण्या पेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष राजकारण करण्यातच जास्त धन्यता मानत आहेत .या तिन्ही पक्षांची झालेली महा विकास आघाडी वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपल्याला येत असलेले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रात कष्टकरी कामगार, गोरगरीब व मजुरांची स्थिती अतिशय बिकट झालेली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मात्र केंद्र सरकारकडे साखर सम्राटांना पॅकेज देण्याची मागणी करत आहेत .राज्यातील सर्व उद्योगधंदे दोन महिन्यापासून बंद पडलेले असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण महाराष्ट्रात प्रचंड वाढले आहे .स्थलांतरित मजुरांना मदतीचा हात देण्याऐवजी राज्य सरकार केंद्र सरकारकडे वारंवार पैशाची मागणी करत आहे .

महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षांमध्ये कसलाही ताळमेळ नसल्यामुळे प्रत्येकाचे तोंड कोणत्या दिशेला आहे हे त्यांनाच समजत नाही .शेतकरी ,शेतमजूर, कष्टकरी कामगार प्रचंड अडचणीत आलेला असतानाही त्याकडे लक्ष देण्यास सरकारला अजिबात वेळ नाही .राज्यात सर्वांना रेशन द्वारे धान्यपुरवठा न केल्यामुळे  गोरगरीब व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे .कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यापेक्षा विधान परिषदेची निवडणूक व साखर सम्राटांना मदत हे विषयच महाराष्ट्र सरकारला अधिक महत्त्वाचे वाटते .आता गोरगरीब व मजुरांच्या  अन्नधान्य अभावी झुंडीच्या झुंडी आता रस्त्यावर येतील.

पोलिसाच्या दंडुक्याच्या धाकाने गोरगरीब व मजूर जास्त दिवस घरात बसून राहणार नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडमुठ्या व निष्क्रिय धोरणामुळे  राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघत आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली आहे . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार टाळेबंदी जाहीर करणे हा उपाय नव्हे, त्यासाठी केंद्र सरकारने टाळेबंदी संदर्भात घालून दिलेले सर्व नियमांची काटेकोर पणे अंमलबजावणी करणे हा उपाय आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियोजनशून्य, निष्क्रियतेचा फटका महाराष्ट्रातील जनतेला बसत असल्याचे स्पष्ट मतही ॲड भोसले यांनी व्यक्त केले आहे.

From around the web