उस्मानाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

 
उस्मानाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या


उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही भागात पेरण्या झाल्या असल्या तरी बोगस बियाणेमुळे सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.


यंदा पुन्हा एकदा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अर्ध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे, तर अर्ध्या भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. यंदा अनेक वर्षांनंतर जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पेरणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे जून महिन्यातील मृग नक्षत्रामध्ये पाऊस होत नव्हता. त्यामुळे कायम पेरणी लांबणीवर पडत असे. त्यामुळे मूग, उडीद अशा पिकांना फारसा वाव मिळत नव्हता. यंदा मात्र मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावल्याने पेरणी अनेकांनी आटोपली. त्यामुळे पिकांसाठी पुढील काळात पोषक वातावरण राहू शकते. जेव्हा पेरणी मृगामध्ये होते. तेव्हा ते वातावरण खरीप पिकांसाठी पोषक ठरते.


जिल्ह्यातील भूम, वाशी, उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे या चारही तालुक्यात पेरणीची प्रक्रिया जोमात सुरू आहे. वाशी तालुक्यात सर्वाधिक २२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर कळंब तालुक्यात १९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कायम दुष्काळी पट्टा असलेला हा भाग यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या जोरदार हजेरीने जोमात असल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद तालुक्याच्या काही भागांत चांगला पाऊस झाला असला तरी काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर आणि परंडा या चार तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने जमिनीत पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केलेली नाही. सर्वात कमी पाऊस उमरगा तालुक्यात केवळ ७० मिलिमीटर झाला आहे. तर परंडा तालुक्यात ७६, लोहारा ९० आणि तुळजापूरमध्ये १०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
उमरगा, लोहारा आणि परंडा तालुक्यात पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर तुळजापूर तालुक्याच्या काही भागांत चांगला पाऊस झाला असला तरी बहुतांश भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या चारही तालुक्यात पेरणी झालेली नसून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

From around the web