उस्मानाबादला रेमडेसिवीरच्या ५०० वायल्स आल्याच नाहीत !

आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा दावा फोल 
 
उस्मानाबादला रेमडेसिवीरच्या ५०० वायल्स आल्याच नाहीत !

उस्मानाबाद - उस्मानाबादला रेमडेसिवीरच्या ५०० वायल्स जालना  येथून मिळणार असल्याचे भाजप  आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी १५ एप्रिल रोजी एक पत्रक काढून सांगितले होते, मात्र तीन दिवस झाले तरी या  वायल्स  उस्मानाबादला आल्या  नसून ते मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे माशी नेमकी कुठे शिंकली ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. 

अनेक दिवसांपासून रेमडेसिवीरचा तुटवडा महाराष्ट्रभर भासत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात या औषधाची गरज असताना प्रत्यक्षात उपलब्धता अत्यंत कमी होती. शासकीय आरोग्य यंत्रणेकडे असलेला साठा संपला होता व मागणी करूनही रेमडेसिवीर उपलब्ध होत नव्हते.  आरोग्यमंत्री ना. राजेशजी टोपे यांनी जालन्यात १०००० रेमडेसिवीर च्या व्हायल्स उपलब्ध करून दिल्याचे ट्विटर द्वारे जाहीर केले होते.  ना. राजेशजी व ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे उस्मानाबादला रेमडेसिवीर देण्याबाबत आपण मागणी केल्याचे आ. राणा पाटील यांनी सांगितले होते. 

 जिल्हाधिकारी, जालना यांच्याबरोबर चर्चा करून ५०० व्हायल्स उस्मानाबादसाठी तातडीने उपलब्ध करण्याचे मान्य झाले व जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. हे ५०० व्हायल्स आज उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात पोहोचतील व जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेला रुग्णांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात येतील, असे पत्रक आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी १५ एप्रिल रोजी प्रसिद्धीसाठी काढले होते. 

मात्र तीन दिवस झाले तरी रेमडेसिवीरच्या ५०० वायल्स उस्मानाबादला आल्या नसून  ते मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.  त्यामुळे राजकरण नेमके कोण करतंय ? त्यात सर्वसामान्य लोकांचा बळी का घेताहेत ? असा सवाल उस्मानाबादकर करीत आहेत. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे उस्मानाबादचे जावई  आहेत, मात्र त्यांचे उस्मानाबादकडे दुर्लक्ष होत आहे. 


 उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय आणि  जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय यांच्या स्वच्छता, कपडे धुणे, रुग्णांना जेवण, नाश्ता देणे याचे टेंडर जालन्याच्या एका संस्थेकडे आहे. ही  संस्था कुणाची आहे. प्रत्यक्षात मलिदा कोण खातंय ? याची जोरदार चर्चा सुरु आहे.टेंडरमध्ये दिलेल्या सर्व अटींचे सर्रास उल्लंघन होत असताना  त्याविरुद्ध बोलण्याची धमक कुणामध्ये दिसत नाही. 


 

From around the web