उस्मानाबाद : बियाणे उगवणशक्ती प्रात्यक्षिक ठरतेय कोरोना स्प्रेडर
उस्मानाबाद - येणाऱ्या खरीप हंगामात दर्जेदार बियाणे घरच्या घरीच उपलब्ध करता यावे व उगवणशक्ती चांगल्या प्रकारचीच असलेलेच बियाणे पेरणीसाठी वापरता यावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन बियाणे उगवण शक्तीचे प्रयोग प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले जात आहेत. मात्र कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव त्यातच अनेक शेतकरी कोरोना पॉझिटिव्ह निघू लागल्यामुळे प्रात्यक्षिके करून दाखविणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी ते धोकादायक ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते प्रात्यक्षिके तात्काळ थांबविणे शेतकर्यासह कृषी अधिकारी व पर्यायाने जनतेच्या हिताचे ठरणार आहे.
गत वर्षीपासून राज्य शासनाच्यावतीने बियाणे उगवणशक्ती प्रात्यक्षिके घेण्याचे धोरण अवलंबिले गेले असून राज्यातील शेतकरी बियाणांमध्ये स्वयंपूर्ण व्हावेत हा उद्देश त्या पाठीमागचा आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक गावामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी संबंधित गावच्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सोबत घेऊन बियाणे उगवण शक्ती प्रात्यक्षिक करून दाखवित त्या पद्धतीने प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना देखील करायला भाग पाडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरीच तयार केलेल्या बियाणांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचे बियाणे तयार केल्यामुळे त्यांचा बियाणी विकत घेण्याचा खर्च आपोआप वाचून त्यांची अप्रत्यक्षपणे उत्पादन खर्चात कपात झाली होती. यंदा देखील कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी संबंधित गावच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन बियाणी उगवणशक्ती प्रात्यक्षिके करून दाखवीत आहेत.
कोरोना पॉझिटीव्ह शेतकऱ्यांच्या उपस्थित प्रात्यक्षिके !
कृषी विभागाच्या माध्यमातून गावोगावी बियाणे उगवणशक्ती प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना सोबत घेऊन व त्यांनी स्वतः अशा पद्धतीने प्रयोग करावा यासाठी त्यांना समजावून सांगत प्रात्यक्षिके करीत आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना कोरोना विषाणूंची बाधा झाल्याने ते पॉझिटीव्ह येत आहेत. प्रात्यक्षिके करताना शेतकरी यामध्ये सहभागी होत असल्याने त्या विषाणूंचे संक्रमण उपस्थित असलेल्या इतर शेतकर्यांसह कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील होऊ शकते. त्यामुळे सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वेळप्रसंगी जीवावर बेतण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे काय ?
गावोगावी जाऊन उगवणशक्ति प्रात्यक्षिके करण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, प्रयोग सहाय्यक व इतर कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे ते संबंधित अधिकारी आपल्या कार्य क्षेत्रातील गावात जाऊन तेथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन कशा पद्धतीने बियाणे उगवणशक्ती प्रयोग करायचा ? त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवित आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना लसीकरण करण्यात आलेले नाही. एकीकडे शासन फ्रंट वर्कर म्हणून शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे करीत आहे. तर दुसरीकडे कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची फ्रंट वर्कर म्हणून साधी गणना देखील केली जात नसल्याची बाब समोर आली आहे.