उस्मानाबादेत अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीस दीड लाख केले परत
उस्मानाबाद - रात्रीच्या सुमारास अपघात होऊन या अपघातात ३५ वर्षीय तरुण व त्याच्या पाच वर्षीय चिमुकल्याचा जागीच करून अंत होतो. त्यांच्यासोबत पिशवीमध्ये असलेली रक्कम परिसरातील एका उदार, मोठ्या मनाच्या व दातृत्व वृत्ती असलेल्या व्यक्तीने व्यवस्थितरित्या जतन करीत मयताची राख सावडण्याच्या (तिसरीच्या) कार्यक्रमात संबंधित मयतच्या पत्नीस खात्री करुन उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये चक्क दीड लाख रुपयाची थैली जशी होती तशीच सुपूर्द केली. यामुळे उपस्थितांसह सर्वांच्याच नजरेत त्या व्यक्तीविषयी आदराची भावना तर आपोआपच निर्माण झाली.
एकीकडे मयताच्या टाळूवरील लोणी खाणारी वृत्ती सर्वत्र फोफावत असतानाच हा प्रकार म्हणजे पुन्हा इमानदारीच्या वाटेवर जात असल्याचे संकेत आहेत. मात्र आजच्या दुनियेत देखील पैशाच्या मागे नव्हे तर अडी अडचणीत सापडलेल्या दीनदुबळ्यांना मदत करण्यासाठी अनेक इमानदार व प्रमाणिक व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सतत काम करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांनी दातृत्वा सह माणुसकी जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी हा प्रामाणिकपणा दाखविला आहे. त्या राजेंद्र करवार यांचे बंधू संतोष हे जिल्हा पोलीस अधीक्षक राजरोशन तिलक यांचे अंग सुरक्षारक्षक (बॉडीगार्ड) म्हणून कार्यरत आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव येथील सचिन तुकाराम माने (वय ३५) व पाच वर्षीय चिमुकला प्रफुल्ल हे दि.८ फेब्रुवारी रोजी उस्मानाबादहून गावी जात असताना सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास राघुचीवाडी नजीक मोटारसायकल-आयशरची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेही जागीच गतप्राण झाले. यावेळी गाडीला लटकवलेली पिशवी दूर उडून पडली. या पिशवीमध्ये रुमालात बांधून ठेवलेले दीड लाख रुपयांचे गाठोडे राघुचीवाडी येथील राजेंद्र करवार यांनी घेऊन आपल्या घरी व्यवस्थित ठेवली. मयत व्यक्तीची सर्व माहिती व खातरजमा करुन घेतली.
सदरील मयत व्यक्तीने कांदे विक्री करून ज्यांचे देणे होते ते देऊन उरलेली रक्कम गावाकडे घेऊन जात होते. मात्र काळाने घाला घातल्यामुळे ती रक्कम त्या ठिकाणीच पडली. ही रक्कम त्या व्यक्तीचीच असल्याची खात्री पटल्याने राजेंद्र करवर यांनी तिसरीला राख सावडण्याचा दिवशी घटनास्थळी जाऊन दुःखाच्या सागरात बुडालेल्या माने परिवाराला एक प्रकारे इमानदारीरुपी आर्थिक मदतीची नवसंजीवनी दिल्यामुळे उपस्थितांसह सर्वांचेच डोळे या इमानदारीचे कौतुक करण्यासाठी ओलेचिंब होत पाणावले हे विशेष.
करवर यांची इमानदारी अन् लखपती
राजेंद्र करवार हे अपघातस्थळी धावून येणे व त्यांनाच ती दीड लाख रुपयांची पिशवी मिळणे. तसेच ती थैली सुरक्षित ठेवून त्या पैशावर आपले मन जाऊ न देणे. विशेष म्हणजे एक रुपयाचा ठोकळा किंवा एखादी नोट रस्त्यावर पडली तर त्यासाठी झोंबाझोंबी करणारी वेळ प्रसंगी खून देखील करणारी मंडळी आपण क्षणोक्षणी अनुभवत आहोत. मात्र हाती लागलेले दीड लाखाचे गबाळ याची तर कोणाला कल्पना देखील नव्हती. त्यामुळे याबाबत कोणी वाच्यता देखील करू शकत नव्हतेच. पैशाच्या मागे लागलेल्या दुनियेत देखील इनामदारी व प्रामाणिकपणा टिकून असल्याचे यावरुन अधोरेखित झाले आहे. खरोखरच हा निव्वळ योगायोग असून अशी दानशुर व प्रामाणिकपणाची वृत्तीच माणुसकीचे नाते पुन्हा आपुलकीने घट्ट करीत असल्याचे जीवंत उदाहरण आहे.
गुन्हा दाखल
सचिन तुकाराम माने वय-35 वर्ष् रा. झरेगाव ता. उस्मानाबाद हे मुलगा प्रफुल्ल वय-4 वर्ष यास घेवुन 8 फेब्रुवारी रोजी 20.30 वा. सु. राघुचीवाडी परिसरातुन मोटारसायकल चालवत जात होते. या वेळी वाहन क्र.एम.एच.25 ए.जे.0979 च्या अज्ञात चालकाने वाहन चुकीच्या दिशेने चालवुन माने यांच्या मोटारसायकलला समोरुन धडक दिल्याने माने पिता-पुत्र गंभीर जखमी होवुन मयत झाले. अपघातानंतर तो अज्ञात चालक घटनास्थळावरुन वाहनासहीत पसार झाला. अशा मजकुराच्यारोहित सुरवसे , रा.येडशी यांनी 11 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.