डॉक्टर दिनीच चिमुकलीच्या मदतीला डॉक्टररुपी देव आला धावून 

उस्मानाबादच्या पाच वर्षीय समीना तांबोळीने  गिळलेला कॉईन विनाशस्त्रक्रिया काढला बाहेर
 
s

उस्मानाबाद  - आधुनिक प्रगत वैद्यकीय उपचार पद्धती आत्मसात करणाऱ्या डॉक्टरांची जिद्द व प्रयत्नांमुळे पाच वर्षीय चिमुकलीने एक रुपयाचा गिळलेला पोटातील कॉईन विना शस्त्रक्रिया अलगदपणे बाहेर काढून तिचे प्राण वाचविले आहेत. योगायोग म्हणजे ही घटना डॉक्टर दिनीच दि. १ जुलै रोजी घडली. त्यामुळे डॉक्टरच्या रुपाने या चिमुकलीच्या मदतीसाठी खऱ्या अर्थाने डॉक्टरातील देव माणूस धावून आल्याचा प्रत्यय आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उस्मानाबाद शहरातील पाच वर्षीय समीना तांबोळी या चिमुकलीने खेळत असताना तिच्या हातातील एक रुपयाचा कॉईन नकळतपणे तोंडातून पोटात गिळला गेला. हा प्रकार तिच्या आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांनी उस्मानाबाद येथील खासगी व जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी एक्सरे काढल्यानंतर त्यामध्ये कॉईन असल्याचे निष्पन्न झाले. मात्र ते पोटातून बाहेर काढण्याची सुविधा नसल्यामुळे डॉक्टरांनी सोलापूरला जाण्याचा सल्ला तिच्या पालकांना दिला. 

पोटात कॉइन गेल्यामुळे दुखू लागल्याने समीनाला काहीही खाता येत नव्हते किंवा पाणी पिता येत नव्हते.  तिच्या आई-वडिलांसह इतर नातेवाईकांना देखील तिची काळजी वाटू लागली. त्यामुळे त्यांनी समीनाला सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमेय ठाकूर व डॉ. रवी कंदलगावकर यांनी यशस्वीरित्या विना शस्त्रक्रिया तिच्या पोटातील एक रुपयाचा कॉईन अलगदपणे बाहेर काढून तिची होणाऱ्या वेदनेपासून सुखरूप सुटका केली. 

हा उपचार डॉक्टर दिनी केल्यामुळे डॉक्टरमध्ये असलेला उपचाररुपी देव माणूस चिमुकलीचे आजारपण दूर करण्यास धावून आल्यामुळे या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

गरिबांनी रुग्णसेवेचा लाभ घ्यावा - डॉ. ठाकूर

सोलापूर येथील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयांमध्ये या बालिकेवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत. उपचार करणारे डॉ. अमेय ठाकूर व डॉ. रवि कंदलगावकर हे गेल्या दोन वर्षांपासून तन-मन-धनाने रुग्ण सेवा करण्याचे कार्य करीत आहेत. त्यांना चांगले प्रशिक्षण दिले असून त्यांच्यात चांगली सुधारणा झाली आहे. तसेच या रुग्णालयात मुळव्याध, वजन कमी करणे, कॅन्सर, स्टेपलर, लेझर आदी शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे जास्तीत जास्त गरीब रुग्णांनी या रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत असे आवाहन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी केले आहे.
 

From around the web