रेल्वेचा मेगाब्लॉक, प्रवाशांच्या खिशाला कात्री ...  

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाडया बंद झाल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय 
 
s

उस्मानाबाद  :   दौंड-कुर्डुवाडी विभागातील भाळवणी ते वाशिंबे रेल्वे स्थानकांच्या दरम्यानचे २६.३३ किलोमीटर दुहेरी लाइन सुरू करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वेने हा मेगाब्लॉक घोषित केला आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू करण्यात आला आहे. यामुळे उस्मानबादमार्गे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या सर्व चारही रेल्वेच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. गुरुवारपासून (दि. १४) या फेऱ्या बंद असून २८ ऑक्टोबरपर्यंत त्या बंद राहतील. यामुळे उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यातील प्रवाशांची गोची झाली असून , प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

दौंड-कुर्डुवाडी विभागातील भाळवणी ते वाशिंबे रेल्वे स्थानकांच्या दरम्यानचे २६.३३ किलोमीटर दुहेरी लाइन सुरू करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वेने हा मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामध्ये लोहमार्गाचे विघटन आणि स्थानांतरण करण्यात येईल. तसेच टर्नआउट स्लीपर घालणे, ट्रॅक सर्किटमध्ये बदल करणे, ड्रेलिंग स्विचची मर्यादा वाढवणे, नवीन क्रॉस ओव्हर घालणे अशी कामे योजली आहेत.कुर्डुवाडी, दौड विभागात दोन टप्प्यात लोहमार्ग दुहेरीकरण व अन्य कामे करण्यात येत आहेत. यातून वाहतूक सुरळीत व वेगवान होण्याचा उद्देश आहे. कामे व्यवस्थित पार पडण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात फेऱ्या बंद केल्या आहेत.असे  प्रदीप हिरडे, वाणिज्य सहप्रबंधक, सोलापूर यांनी सांगितले. 

लोहमार्गाचे दुहेरीकरण व अन्य किरकोळ कामांसाठी तब्बल १४ दिवसांचा मेगाब्लॉक रेल्वेने सुरू केला आहे. याचा परिणाम रेल्वेच्या नियमित वाहतुकीवर झाला आहे. तब्बल १४ ये - जा करणाऱ्या रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून ३३ रेल्वेच्या फेऱ्या मुळ मार्गावरून अन्यत्र वळवण्यात आल्या आहेत. तसेच दोन रेल्वेच्या फेऱ्या अंशत: वळवण्यात आल्या आहेत.

उस्मानाबाद मार्गे प्रामुख्याने पुणे व मुंबईला जाणाऱ्या लातूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (मुंबई), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते बिदर, नांदेड ते पणवेल, हैदराबाद ते हडपसर या रेल्वे धावतात. तसेच याच रेल्वे उलट मार्गेही धावतात. अन्य वेळीच या सर्व रेल्वेंना मोठ्याप्रमाणात गर्दी असते. बहुतांशवेळी तर उस्मानाबादच्या प्रवाशांना जागाही उपलब्ध नसते. आरक्षण २० ते ३० अगोदरपासून वेटींगवर पडलेले असते. एकूणच मुंबई – पुण्याहून येणारे व तिकडे जाणारेही प्रवासी मोठ्याप्रमाणात असतात. अशात नवरात्र व आश्विनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रेल्वेने येतात. तसेच दिवाळीच्या सुटीचे वेध लागल्यामुळे याच काळात पुणे, मुंबईला काम करणारे चाकरमाने गावाकडे परतत असतात. मात्र, या चारही रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे या सर्वांचीच मोठी गैरसोय झाली आहे.

पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे खासगी प्रवासी भाड्यात मोठी वाढ झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस  खासगी ट्रॅव्हल्स प्रवासी भाड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आधार असलेली रेल्वे देखील बंद असल्याने  प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

या रेल्वेच्या फेऱ्या अशा राहतील बंद

  • नांदेड – पनवेल – नांदेड >दि. १४ ते २८ ऑक्टोबरच्या सर्व.
  • हैदराबाद – हडपसर > दि. १८, २१, २३, २५, २८ ऑक्टोबर.
  • हडपसर – हैदराबाद >दि. १९, २२, २४,२६, २९ ऑक्टोबर.
  • सीएसएमटी - लातूर >दि. १८, १९, २१, २४,२५, २६ ऑक्टोबर.
  • लातूर – सीएसएमटी >दि. १९, २०, २२, २५, २६, २७ ऑक्टोबर.
  • सीएसएमटी - बिदर > दि. २०, २२, २३ ऑक्टोबर.
  • बिदर – सीएसएमटी > दि. २१, २३, २४ ऑक्टोबर.

परिवहन महामंडळाची तयारी
सद्यस्थितीत तुळजापूर यात्रेवर परिवहन महामंडळाचा भर आहे. मंगळवार, बुधवारी यात्रा संपल्यावर प्रवाशांचा कल पाहून मुंबई, पुण्याच्या बसफेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. रेल्वे बंद झाल्यापासून या दोन्ही ठिकाणच्या फेऱ्या फुल्ल आहेत. असाच प्रतिसाद असेल तर फेऱ्यात आणखी वाढ करण्यात येईल, असे उस्मानाबादचे आगारप्रमुख पी. एम. पाटील यांनी सांगितले.

From around the web