शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा सुरळीतपणे घेण्यात येणार
- उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
उस्मानाबाद - बीए, बीकॉम, बीएस्सी, एमए, एमकॉम, एमस्सी यासह सर्व विभागातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा माहे ऑक्टोंबर 2020 अखेर पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरळीतपणे घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकास,ऊर्जा,आदिवासी विकास,उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या परीक्षा कोविड-19 मुक्त वातावरणात कशी घेता येईल ? याबाबत आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निंबाळकर,गोविंद काळे, संचालक डॉ.दत्तात्रय गायकवाड, उप कुलसचिव विष्णू कऱ्हाळे, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख आदिसह विद्यापीठाचे पदाधिकारी प्राध्यपक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की, शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्याच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा कोरोना-19 मुक्त वातावरणात कशा घेता येतील ? यासाठी संपूर्ण विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करीत असून एकही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेला नव्हता त्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दि.29 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत देण्यात आली असून विशेष म्हणजे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयावर सोपविण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्याच्या पसंतीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा दयाची हे पर्याय त्यांना खुले केले असून आतापर्यंत 70 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेला प्राधान्य दिले आहे. या परीक्षा एमकेसीएल ने तयार केलेल्या सॉप्टवेअरवर घेण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्यांना जवळचे महाविद्यालय असेल त्या ठिकाणी देखील परीक्षेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात घेण्यात येणार असून एका विद्यार्थ्यांला चार तासापैकी एक तास परीक्षेसाठी देण्यात येणार आहे, असे त्यांनी सुचित केले.
या परीक्षा सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार व युजीसीच्या नियमवलीनुसार घेण्यात येणार आहे.ज्या रुममध्ये विद्यार्थी परीक्षेसाठी बसला आहे.त्या विद्यार्थ्याजवळ दुसरा व्यक्ती जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यामध्ये परीक्षेबाबत जनजागृती चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी प्रत्येक जिल्हयातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्याची स्वतंत्र बैठक घेण्यात आलेली आहे.तसेच त्याबरोबरच जे विद्यार्थी अनुर्तीण त्याना निकाला नंतर एक महिन्यामध्ये पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ज्या विद्यार्थ्यांना विशेषता दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षकांनी मोबाईल परीक्षेच्या काळात उपलब्ध करून दयायचे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 80 हजार 283 विद्यार्थी परीक्षा देणार असून 1 हजार 46 दिव्यांग विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असून या सर्व विद्यार्थ्यांची सर्व सुविधा प्रक्रिया पुरविण्याचे काम विद्यापीठ स्तरावर अतिशय नियोजन बध्द पध्दतीने सुरू असल्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.
यावेळी उपकेंद्रात आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी मंत्री महोदयाकडे मागणी केली तर यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने सातवा वेतन आयोग लागु करावा यासह इतर मागण्याचे निवेदन दिले.
जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट
उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी covid-19 च्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी प्रत्यक्ष भेट देऊन केली. तसेच या ठिकाणी कशा पद्धतीने कोविड रुग्णावर उपचार केले जात आहेत याची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनमंत वडगावे, निवासी वैद्यकीय अधिकारी सचिन बोडके, डॉ.सचिन देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.