अंतरवाली शिवारात बिबट्या सदृश्य प्राणी 

वन परिमंडळ अधिकाऱ्यानी केली पाहणी ( व्हिडीओ )
 
अंतरवाली शिवारात बिबट्या सदृश्य प्राणी

भूम -  भूम तालुक्यातील अंतरवाली शिवारात बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे . हा खरंच बिबट्या होता का ? याचा शोध वन अधिकारी घेत आहेत. 

तालुक्यातील  अंतरवली शिवारात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जेजला गावातील अंगद शिंदे यांना बिबट्या सदृश प्राणी रस्त्याच्या कडेला दिसल्यानंतर त्यांनी वन विभागाला तातडीने सदरील माहिती कळवली. त्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  यावेळी सदरील ठिकाणाचे ठाशांचे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी निरीक्षण केले परंतु सदरील परिसर माळरान असल्यामुळे आणि कोरडी माती असल्यामुळे ठसे स्पष्टपणे दिसत नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. 

 यावेळी आसपासच्या परिसरात फिरून तसेच ठशे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला व वनविभागाकडून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी एकटे फिरू नका हातामध्ये काठी असू द्या किंवा मोबाईल असेल तर मोबाईलची मोठ्या आवाजात गाणी चालू असूद्यात असे आवाहन वनविभागाचे अधिकारी टाके  यांनी केले आहे.  यावेळी वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी  ए जे कुलकर्णी ,वनरक्षक श्री एस यु टाके,  शेळके त्याच बरोबर प्रत्यक्षदर्शी अंगद शिंदे यांच्यासोबत जेजला व अंतरवली ग्रामस्थांची उपस्थिती होती. 
 

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, परिसरात भीती

भूम तालुक्यातील पन्हाळवाडी शिवारात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बबन भगवान कांबळे (६५) हे शेतात ज्वारीला पाणी देणारे शेतकरी जखमी झाले. ही घटना बुधवारी पहाटे १ ते १.३० वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकारामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी बुधवारी सायंकाळी अंधार पडण्यापूर्वीच गाव जवळ केले.
भूम तालुक्यातील बावी येथील शेतकरी बबन कांबळे हे मंगळवारी रात्रीचा वीजपुरवठा असल्याने ज्वारीला पाणी देण्यासाठी पन्हाळवाडी शिवारातील शेतात गेले होते. मध्यरात्रीनंतर एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला. यामध्ये त्यांच्या हाताला मोठी जखम झाली. यामध्ये त्यांच्या हाताचा लचका तोडण्यात आला. यावेळी ते शेतात एकटेच होते. यावेळी कांबळे यांच्या सोबतच्या दोन कुत्र्यांनी त्या वन्य प्राण्यावर हल्ला केल्यामुळे बबन कांबळे यांचे प्राण वाचले असे कांबळे यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरामध्ये वाघ आल्याची अफवा पसरल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. 

From around the web