जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर जमीन व्यवहाराची सचित्र माहिती

 
d

उस्मानाबाद -  जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्हयातील शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाचे कार्यालय आहे. जिल्हयातील शेतकरी महसूल विषयक सुनावण्या, 'भूसंपादनाची कामे, विविध परवानग्या, शेत रस्त्यांची मागणी यासारख्या अनेक कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या संकल्पनेतून विविध जमीन व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर गोष्टी रुपात सचित्र माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत.

 श्री.शेखर गायकवाड, साखर आयुक्त महाराष्ट्र यांचे गोष्टीरुप जमीन व्यवहार निती या पुस्तकातील निवडक 42 कथांचे व त्यातील कायदेशीर तरतुदींचे बोर्ड तयार करण्यात आले आहेत. हे बोर्ड रंगीत स्वरुपात असल्याने प्रत्येकाचे त्याकडे लक्ष जाते. त्यावर शेतक-यांचा चित्ररुप संवादही दर्शविला आहे. जमिनीच्या खरेदी- विक्रीचे अनेक क्लिष्ट कायदे आहेत. अनेकांना ते लक्षातही येत नाहीत. त्यामुळे जमीनीचे व्यवहार होताना अनेकदा फसवणूकही होते. तसे प्रकारही घडलेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना जमिनीच्या व्यवहाराची माहिती सहज व सोप्या शब्दात कळावी, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हे फलक लावण्याचा संकल्प जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी केला होता. सद्या विभागीय आयुक्त मा.सुनिल केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली "सुंदर माझे कार्यालय" हे अभियान सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या फलकावर गोष्टीरुपात दिलेली माहिती मोजक्या व प्रभावी शब्दांत मांडण्यात आलेली आहे. आठ ते दहा ओळींचीच ही कथा आहे. ही कथा संपल्यानंतर तात्पर्य म्हणून त्यातून निघणारा बोध ठळक अक्षरात अधोरेखित करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतक-यांना संबंधित कायद्याची माहिती पटकन होते.

गावा- गावात नेहमी काही ना काही जमिनीचे व्यवहार सुरु असतात. त्यात प्रामुख्याने जमिनीची खरेदी-विक्री, कर्जासाठी गहाणखत, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण, भाऊबंदकीतील वाद, जमिनीची वाटणी, फेरफार, सावकारी व्यवहार, कर्ज प्रकरणे, जमिनीचे तुकडे करणे असे व्यवहार होत अरातात. याचे नियम व कायदेही आहेत. हेच कायदे गोष्टी स्वरुपात यात मांडण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेतक-यांनी व नागरिकांनी या गोष्टीरुप नीतीचे वाचन अवश्य करावे, त्यातून जमीन व्यवहाराच्या कायद्याची माहिती मिळेल व बोधही होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.

From around the web