ग्रामपंचायत निवडणूक : प्रस्थापितांना धक्का देत तरुण ठरले गाव कारभारी  !  

सर्वाधिक जागा जिंकल्याचे सर्वच पक्षाचे दावे- प्रतिदावे 

 
ग्रामपंचायत निवडणूक : प्रस्थापितांना धक्का देत तरुण ठरले गाव कारभारी  !

उस्मानाबाद - ग्रामपंचायत निवडणुकीचा तापलेला प्रचार आज निकालानंतर पूर्णपणे थंडावला असला तरी  विजयाचा जल्लोष व पराजयाची सल इथून पुढे कायमपणे पाच वर्ष प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवारांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मनात घर करून राहणार आहे. आज लागलेल्या निकालात शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी वंचित बहुजन आघाडी यासह अपक्ष तसेच महा विकास आघाडी या पक्षांनी ग्रामपंचायत वर आपला विजयी झेंडा फडकावून सत्तेची मोहोर उमटविली आहे.

निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ग्रामीण भागातील सर्व वातावरण ऐन हिवाळ्यात निवडणूक प्रचारवरुन तापले होते. त्यासाठी सर्वच उमेदवार आपल्याला निवडून येऊन गुलाल उधळण्यासाठी मते कशी मिळतील ? यासाठी प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन त्यांना विनवणी करीत होते. प्रत्येक उमेदवारांनी मतदान होण्याच्या शेवटच्या तासापर्यंत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने देखील दाखविली. मतदान झाल्यानंतर मतदारांनी आपापल्या कामात गुंतवून घेतले असले तरी उमेदवार व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी निकाल लागण्या पूर्वी आपल्याला किती मतदारांनी आपल्याला मतदान केले ? याची गोळाबेरीज करून निश्चितपणे विजय आपलाच होणार  असा अंदाज बांधला होता. मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदानाच्या ईव्हीएम पेट्या उघडल्यानंतर त्यामध्ये कोणाला मतदारांनी नाकारले व कोणाला विजयी करीत गुलाल उधळण्याची संधी दिली ? याचा फैसला आज झाल्यामुळे सर्व चित्र स्पष्ट झाले.

 काही हवेत राहून दिवास्वप्न वाहणाऱ्या गाव पुढाऱ्यांचे चेहरे मतमोजणी कक्षातून बाहेर पडताना अगदी हिरमुसले व केविलवाणी झाल्याचे पाहावयास मिळाले. तर विजयी झालेल्या उमेदवारांच्या उत्साहाला उधाण आल्याने त्यांचे पाय मतदान कक्षातून थेट जल्लोष सुरू असलेल्या ठिकाणी धावतच गेले. आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ४७०  मतदारांनी ७ हजार १०७ उमेदवारांना मतदान करून त्यापैकी ३ हजार ६५२ नूतन गाव  कारभारी निवडून देत त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. 

या निवडणुकीत थेट राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रचारात सहभाग घेतला नसला तरी गाव कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आवश्यक ते बर पुरून पुरस्कृत पॅनल उभा करून आर्थिक बळ दिले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी एकाही उमेदवाराला राजकीय पक्षाचे चिन्ह अधिकृतपणे बहाल करण्यात आले नव्हते. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेत व पक्षाचे विचार गावकऱ्यांच्या मनी रुजविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत या निवडणुकीत गुलालाची उधळण करण्याचा चंग बांधला होता.

तालुकानिहाय ग्रामपंचायत व निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे - उस्मानाबाद  ग्रामपंचायत संख्या - ६३, निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या- ६०२, तुळजापूर - ग्रामपंचायत - ४८, निवडून आलेले उमेदवार ४६१ , उमरगा ग्रामपंचायत- ३८, आलेले उमेदवार- ५५३, लोहारा ग्रामपंचायत -  २१, निवडून आलेले उमेदवार- २२२, कळंब ग्रामपंचायत - ५३, निवडून आलेले उमेदवार - ४९५, वाशी ग्रामपंचायत - ३३, निवडून आलेले उमेदवार -२८८, भूम ग्रामपंचायत -६१, निवडून आलेले उमेदवार - ५६५ व परंडा ग्रामपंचायत - ६५, निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या - ५६६ अशा एकूण ३८२ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येऊन त्याद्वारे ३६५२ उमेदवार निवडून आले आहेत. 

 ४० ग्रापने ३२३ निवडले अविरोध उमेदवार 

या  निवडणूक प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील उस्मानाबाद - ३ (२४), तुळजापूर - ४ (३५), उमरगा ११ (९९), लोहारा - ५ (४४), कळंब - ६ (४४), वाशी - १ (५), भूम - ५ (३५) व परांडा - ५ (३७) या ८ तालुक्यातील ४० ग्रामपंचायती अविरोध निघाल्या असून त्याद्वारे ३२३ उमेदवार निवडून आलेले आहेत.

डिजिटल तरुणाईच्या हाती सत्तेच्या चाव्या

आज झालेल्या मतमोजणीत निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई असल्याचे दिसून आले. प्रस्थापित बुजुर्गांना धक्का देत डिजिटल युगातील कारभार पाहण्यासाठी मतदारांनी सुशिक्षित नव तरुणांच्या हाती गावच्या सत्तेच्या चाव्या बहाल केल्या आहेत. विशेष म्हणजे निवडून आलेल्या पुरुष मंडळीमध्ये धोतराचा टक्का हद्दपार झाल्याचेही दिसून आले. 

सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे !

जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतसाठी मतदान  प्रक्रिया पार पडली आहे. मात्र यंदा प्रथमच सरपंच पदाचे आरक्षण मतमोजणी झाल्यानंतर घोषित करणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार दि.२२ जानेवारी रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार असून याकडे सर्व जिल्हावासियांसह निवडुन आलेल्या उमेदवारांच्या नजरा खिळलेल्या आहेत. विशेष म्हणजे या सोडतीत कोणाचे सरपंच पदासाठी लॉटरी लागून भाग्य उजळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिले आहे.


राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदाव्यात सत्य की तथ्य ? 

या निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार व ग्रामपंचायती या आमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली व बॅनरवर निवडून आल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षाकडून करण्यात येऊ लागला आहे. वास्तविक पाहता या निवडणुकीसाठी पक्षाचे अधिकृत चिन्ह एकाही उमेदवार किंवा त्यांना नसल्यामुळे त्या दाव्यात किती  सत्य व तथ्य आहे ? याची माहिती खुद्द दावा करणाऱ्या पक्षाच्या जिल्हास्तरीय नेते व पदाधिकारी यांनाच असल्याने याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२८ पैकी ४२ ग्रामपंचायती बिनविरोध  होत्या, उर्वरित ३८६ पैकी १५१ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्याचा दावा जिल्हाप्रमख आ. केलास पाटील यांनी केला आहे. 

उस्मानाबाद  जिल्हयात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत एकूण 385 ग्रामपंचायत पैकी भारतीय जनता पार्टी प्रणित पॅनलने जिल्हयातील 140 ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे, असा दावा भाजपचे  जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. 

उस्मानाबाद  तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत एकूण ६६ ग्रामपंचायत पैकी भारतीय जनता पार्टी प्रणित पॅनलने जिल्हयातील ४१ ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे, असा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील यांनी केला आहे. 

यामध्ये भानसगाव, सोनेगाव, दाऊतपूर, बेगडा, सांगवी, नांदुर्गा, बोरखेडा, भंडारी, खामगाव, गौडगाव, खामसवाडी, पाटोदा, अनसुर्डा, काजळा, तावरजखेडा, बेंबळी, बोरगावराजे, घाटंग्री, ताकविकी, भांडारवाडी, गावसुद, मेडसिंगा, महादेववाडी/विठ्ठलवाडी, लासोना, सुभा, नितळी, घुगी, गडदेवधरी, मुळेवाडी, रुई ढोकी, वरवंटी, राजुरी, टाकळी ढोकी, बरमगाव, रामवाडी, आळणी, कौडगाव बावी, सकनेवाडी त्याचबरोबर बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायत मध्ये पोहनेर, धुत्ता व डकवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी ग्रामपंचायत  सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. १७ पैकी १२ जागा भाजपला मिळाल्या असून, ते भाजप आमदार राणा पाटील समर्थक आहेत. 

उस्मानाबाद तालुक्यातील ६५ पैकी ३० ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्याचा दावा शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांनी केला आहे. बेगडा , रुई ढोकी,  भानसगाव , राजुरी चार  गावात  भाजपचा एकही उमेदवार नव्हता, तरीही या ग्रामपंचायती भाजपच्या  ताब्यात आल्याचा दावा तालुक्याध्यक्ष राजाभाऊ पाटील करताहेत, हा दावा हास्यस्पद  असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख सतीश सोमाणी सांगितले. 

मनसेचे दोन जिल्हाध्यक्ष पराभूत 

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे  तीन जिल्हाध्यक्ष निवडणूक आखाड्यात उतरले होते. त्यापैकी दोघांचा पराभव  झाला तर एकाचा विजय झाला. 

 राजेंद्र गपाट, इंदापूर ( ता.वाशी) येथुन उमेदवार होते यांचा दारुण झाला तर आबासाहेब ढवळे  तांदुळवाडी (ता.परांडा) येथून  उमेदवार होते , त्यांनाही  पराभवाची धुळ चाखावी लागली.  मात्र प्रशांत नवगिरे, जळकोट (ता.तुळजापूर) येथून  विजयी झाले. 

तुळजापूर तालुक्यात महाविकास आघाडीची सरशी 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. येथे ऍड. दीपक आलुरे यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित पॅनेलचा दारुण पराभव  झाला.१७ पैकी एका जागेवर समाधान मानावे लागले. वार्ड क्रमांक चार मध्ये अनिता घुगरे या केवळ सात मतांनी विजयी झाल्या. १६ जागा महविकास आघाडीला मिळाल्या. माजी सरपंच सरिता मोकाशे यांच्यासह धनराज मुळे , डॉ. जितेंद्र कानडे , डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. बिराजदार , यांच्यासह काँग्रेसचे १४ उमेदवार विजयी झाले. वार्ड क्रमांक ३ मध्ये शिवसेनेचे बाळकृष्ण घोडके आणि सौ. गोदावरी गुड्ड  हे बहीण  - भाऊ  विजयी झाले.  येथे काँग्रेसचा सरपंच होणार असला तरी शिवसेनेला उपसरपंच पद मिळणार का ? याकडं लक्ष वेधलं आहे.  

जळकोट ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे गणेश सोनटक्के यांच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनलचा दारुण प्रभाव झाला, महाविकास आघाडीचे अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखालील अशोक पाटील पॅनल विजयी झाले. 

इटकळ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ९ पैकी ९ उमेदवार विजयी झाले. 


 

From around the web