गुड न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या शंभरीच्या आत

 
गुड न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या शंभरीच्या आत

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव अखेर कमी झाला आहे. मंगळवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात नवीन केवळ पाच रुग्ण आढळून आले असून, गेल्या ७-८ महिन्यानंतर सोमवार पाठोपाठ मंगळवारी  एका दिवसात सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात २० जणांना डिस्चार्ज मिळाला असून, अनेक महिन्यानंतर जिल्ह्यातील  कोरोना रुग्णाची संख्या शंभरीच्या आत आली आहे. 
जिल्ह्यात कोरोनाची लाट आल्यापासून सोमवारी आणि मंगळवारी सर्वात कमी रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट शेवटच्या टप्प्यात असावी, असा निष्कर्ष काढण्यात येत आहे. सोमवारच्या अहवालानुसार उस्मानाबाद व उमरगा तालुक्यात प्रत्येकी १ व तुळजापूर तालुक्यात ३ कोरोना रूग्ण आढळून आले. उर्वरित भूम, परंडा, वाशी, कळंब, लोहारा तालुक्यात एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. 

मंगळवारी उस्मानाबाद, उमरगा, भूम तालुक्यात प्रत्येकी एक तर कळंब तालुक्यात दोन नव्या रुग्णाची नोंद झाली. तुळजापूर, लोहारा, वाशी आणि परंडा तालुक्यात एकाही  नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. 

दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार, ९२० रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १६ हजार, २५३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ५७४ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तरीही काळजी घेण्याची गरज 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी - कमी होत चालला आहे. जिल्ह्यात केवळ ९३  ऍक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या शंभरीच्या आत आली आहे. तरीही कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. लोकांनी सोशल डिस्टेंसिंग ( सामाजिक अंतर ) राखून तोंडावर मास्क घालणे अनिवार्य आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील  किती लोकसध्या मास्क वापरतात. हा संशोधनाचा विषय आहे. 

कोरोनावर लस आली आहे, पण सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचण्यास  अजून चार महिने कालावधी सांगितला जातोय. कोरोना कधीही हातपाय पसरू शकतो, त्यासाठी लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.  

From around the web