उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व वाटप होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व वाटप होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी

उस्मानाबाद - भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तरि पोलिस विभागाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत. व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे होण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.

       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी आढावा बैठकीत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिवेगावकर मार्गदर्शन करीत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.

        जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर पुढे म्हणाले की, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी जिल्ह्यात 33 हजार 67 मतदार असून त्यांच्यासाठी 72 मतदान केंद्र व दोन सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण 74 मतदान केंद्र आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस विभागाच्या वतीने दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी या मतदानाच्या दिवशी चोख पोलिस बंदोबस्त देणे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने पोलिस विभागाने मतदान केंद्र बंदोबस्ताचा आराखडा सादर करावा असे त्यांनी सूचित केले.

        या निवडणूक कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था सुरळीतपणे हाताळण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी व ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करावेत. तसेच संवेदनशील मतदार केंद्राची निश्चिती करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा व व्हलनेरबिलिटी मॅपिंग करून त्याची निश्चिती करावी, अशा ही सूचना जिल्हाधिकारी देगावकर यांनी दिल्या.

     त्याप्रमाणेच निवडणूक कालावधीत जिल्ह्याच्या कोणत्याही भागात अवैध दारू निर्मिती व वाटप होणार नाही याबाबत पोलिस विभागाने दक्षता घेऊन अशा ठिकाणी धाडी घालून अवैध दारू ठिकाणे उध्वस्त करून संबंधितावर कडक कारवाई करावी. त्याप्रमाणेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करतील अशा गुन्हेगार व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावावेत असे निर्देश दिवेगावकर यांनी दिले. सर्व उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात योग्य त्या उपाय योजना राबवून ही निवडणूक प्रक्रिया शांततामय, निर्भय व उत्साही वातावरणात पार पडतील याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

    पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत जिल्ह्यात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत योग्य ती दक्षता घेण्यात आलेली असून निवडणूक कालावधीत कुठेही गैरप्रकार होणार नाही यासाठी पुरेसे पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आलेले आहे तसेच जिल्ह्यात कोठेही अवैध दारू निर्मिती व वाटप होणार नाही याचाही व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक राज्य रोशन यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून जिल्ह्यात सर्वत्र चोक बंदोबस्त करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

      प्रारंभी उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनी भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देऊन त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून स्थापित केलेल्या विविध पथकांची माहिती दिली. तसेच  दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी या मतदारसंघासाठी 33 हजार 67 मतदार मतदानाचा हक्क बजावतील असे सांगून यासाठी 72 मतदान केंद्र दोन सहाय्यकारी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आल्याची माहिती देऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
              
 

From around the web