धाराशिव ते उस्मानाबाद आणि आता उस्मानाबाद ते धाराशिव ...
उस्मानाबादच्या नामांतराची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. उस्मानाबादला शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेज आणि ट्यूटरवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आल्यानंतर उस्मानाबादच्या नामांतराची पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. यावरून राजकारण सुरु झाले आहे आणि ते तापत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी शनिवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करून नामांतराची मागणी उचलून धरली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, एकनाथ शिंदे यांनी उस्मानाबादचं जुनं नाव धाराशिव आहे. लोकांची भावना आहे की , उस्मानाबादचं नामांतर करावं. शासन जनभावना लक्षात घेऊन लवकरच याबाबत शासन निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाआघाडी सरकार सत्तेवर आहे. राष्ट्रवादीची भूमिका गोलमाल आहे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमूख यांनी कोणतेही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही, त्यामुळे उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार का ? आणि ठराव आला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमिका काय राहील ? याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
धाराशीव नावाचा इतिहास
उस्मानाबादची कुलदेवता धारासूर मर्दिनी आहे. त्यावरूनच या शहराला नाव धाराशिव पडलं असावं, असे अनेकांचे मत आहे.
धारासूर नावाचा राक्षस होता. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. त्यानंतर देवीने अवतार घेऊन धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे.
1972 साली शासनाने प्रकाशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रथम गॅझेटियरमध्ये देखील धाराशिव नावाचा उल्लेख आढळतो.
उस्मानाबाद नाव कसं पडलं ?
मराठवाड्यातील सर्व भाग हैद्राबाद निजामच्या अधिपत्याखाली होता. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ मध्ये तर मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून १७ सप्टेबर १९४८ मध्ये मुक्त झाला. याच निजामातील 7 वे मीर उस्मान अली खान यांच्या नावावरून शहराला उस्मानाबाद हे नाव मिळालं. १९०३-०४ मध्ये धाराशिचं उस्मानाबाद करण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि १९२० मध्ये उस्मानाबाद नावावर शिक्कामोर्तब झालं.
नामांतर ठराव मंजूर आणि पुन्हा रद्द
१९९५ मध्ये शिवसेना - भाजपचं युती शासन सर्वप्रथम सत्तेवर आल्यानंतर तत्त्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, उस्मानाबादच्या नामांतराला पाठींबा देवून मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादचे 'धाराशिव' नामांतराचा ठराव मंजूर करून घेतला होता, त्यानंतर नामांतर विरोधी लोकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून नामांतर ठरावास स्थगिती मिळविली होती.
त्यानंतर सन २००० मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर मनोहर जोशी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेला ठराव (उस्मानाबादचं नामांतर धाराशिव ) रद्द केला होता आणि औरंगाबाद खंडपीठात तसे कळवून याचिका निकाली काढली होती.
कै .विलासराव देशमुख यांनी उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव रद्द केला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर विलासरावांचे चिरंजीव आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या फोटोसह धाराशिव झळकत आहे.
पुन्हा याचिका दाखल करणार ..
तत्त्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उस्मानाबादचं नामांतर धाराशिव केल्यानंतर खलील सय्यद, मसूद शेख आदींसह चार लोकांनी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. याचिका दाखल करणारे अन्य तीन जण सध्या ह्यात नाहीत, पण खलील सय्यद, मसूद शेख सध्या कार्यरत आहेत.
महाआघाडी सरकारने उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव मंजूर केल्यास आपण पुन्हा खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे खलील सय्यद आणि मसूद शेख यांनी सांगितले. इतकेच काय तर अनेक याचिका दाखल होतील, असे ते म्हणाले.कागदपत्र तयार आहेत, वकील तयार आहे,फक्त आम्ही सरकारच्या निर्णयाची वाट पाहात आहोत. रस्त्यावर उतरून विरोध करण्यापेक्षा आपण कायदेशीर फाईट देऊ, असे त्यांचं म्हणणे.
मतांचे ध्रुवीकरण की जनतेच्या डोळ्यात धूळफेक ?
महाराष्ट्रात शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाआघाडी आहे. काँग्रेसनं पाठींबा काढल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातूनच मतांचे ध्रुवीकरण सुरु झाले आहे, असे काही जणांचे म्हणणे.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही, हा दाखवण्याचा प्रयत्न यातून सुरु आहे. भाजप आणि शिवसेना पाच वर्षे सत्तेवर होती, तेव्हा उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित झाला नाही, आता मात्र नामांतराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. उस्मानाबादची नगर पालिका निवडणूक जवळ आली आहे. त्यातून हा मुद्दा उपस्थित होत असल्याचे काही लोकांचे मत आहे.