अणदूर - नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेवर कोरोनाचे सावट  

यात्रा भरणार की नाही याबाबत भाविकांत संभ्रम 
 
अणदूर - नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेवर कोरोनाचे सावट

अणदूर - लाखो लोकांचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबाची अणदूर आणि नळदुर्गची यात्रा यंदा होणार की नाही, याबाबत भाविकांत संभ्रम असून, यात्रेबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही सूचना अद्याप न आल्याने मंदिर समितीपुढे पेच निर्माण झाला आहे. 

श्री खंडोबाचे अणदूर आणि  नळदुर्ग मध्ये दोन वेगवेगळे मंदिर असून, देवाची मूर्ती मात्र एकच आहे. श्री खंडोबाची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. अणदूरची यात्रा पार पडल्यानंतर मूर्ती नळदुर्ग मंदिरात नेली जाते आणि  नळदुर्गची यात्रा पार पडल्यानंतर पुन्हा मूर्ती अणदूर मंदिरात आणली जाते. 

मूर्ती अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला  नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात लेखी करार केला जातो. मूर्ती नळदुर्ग मंदिरात असताना दर रविवारी भाविकांची संख्या किमान १० ते २० हजार असते तर पौष  पौर्णिमेच्या यात्रेला किमान पाच लाख भाविक येत असतात तसेच गावोगावच्या सातशे नंदीध्वजाच्या काठ्या येत असतात. 

यंदा कोरोनाचे संकट आहे.सध्या मंदिरे उघडण्यात आली असली तरी यात्रेवर बंदी आहे. त्यामुळे अणदूर आणि नळदुर्गची  यात्रा यंदा होणार की  नाही याबाबत संभ्रम निर्माण  झाला आहे. 

कधी भरते यात्रा ? 

अणदूरची यात्रा प्रथेप्रमाणे यंदा  १५ डिसेंबर रोजी आहे. यात्रा  भरवायची की  नाही, याबाबत मंदिर समितीकडे भाविक विचारणा करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कसल्याही सूचना आलेल्या नाहीत. तुळजापूर तहसीलदारआणि  जिल्हाधिकारी नवे आहेत. त्यांना अणदूर आणि नळदुर्गच्या  यात्रा प्रथेची माहिती नाही. प्रशासनाकडून अद्याप कसल्याही हालचाली  नाहीत. त्यामुळे भाविक, ग्रामस्थ, पुजारी  आणि मंदिर समिती पदाधिकारी सध्या संभ्रमावस्थेत दिसत आहेत. 


 

From around the web