कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद जिल्ह्यात अशी आहे बेडची स्थिती 

 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात अशी आहे बेडची स्थिती

उस्मानाबाद - कोविड केअर सेंटर (सीसीसी) च्या एकूण ३२७२ बेडपैकी १९४६ बेड शिल्लक आहेत,  ऑक्सीजन बेड ७५० पैकी ४६ बेड शिल्लक आहेत, तर आयसीयुच्या २१५ बेड पैकी केवळ ८ बेड शिल्लक आहेत. ही संध्याकाळी ५ वाजे पर्यंतची परिस्थीती होती. सीसीसी हे अधिकांश उस्मानाबाद शहरात व तालुक्याच्या ठिकाणी आहेत आणि  ६० टक्के रिकामे आहेत. उस्मानाबाद शहरातील तेरणा ट्रस्ट संलग्न सीसीसी मध्ये २९५ बेडपैकी केवळ ६८ बेड वापरात आहेत.

 आता शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचाराधीन असलेल्या ५६९० ॲक्टीव्ह रुग्णांपैकी केवळ २६२८ रुग्ण रुग्णालयात, सीसीसी मध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत. उर्वरित ३०६२ (५३%) रुग्णांना अलगीकरण मध्ये राहणे बंधनकारक आहे. परंतू हे बंधन अनेक ठिकाणी पाळले जात नाही हे वास्तव आहे. तज्ञांच्या मते रुग्ण संख्या वाढण्याच्या प्रमुख कारणांपैकी संसर्ग झालेली व्यक्ती घरातील इतरांना व बाहेर फिरत असेल तर बाहेरील इतरांना संसर्ग करते हे एक आहे. 

आताच्या उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेल्या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. ग्रामीण भागातील रुग्णांचे निदान, उपचार व तपासणी व्यवस्थित होत नाही. आजार जास्त झाला कि लोक रुग्णालयाकडे येतात व तोपर्यंत संसर्गाचे प्रमाण अधिक वाढलेले असते. आता ग्रामीण भागापुरते ऑक्सिजन, ताप तपासणे, रुग्णांना अलगीकरनामध्ये ठेवणे व गरजेप्रमाणे औषधोपचार सुरु ठेवणे अत्यावश्यक वाटत आहे. निगराणीखाली असलेल्या रुग्णांना गरजेनुसार व अत्यवस्थ होण्यापूर्वी रुग्णालयात नेणे शक्य होण्यासाठी ग्रामीण भागात सीसीसी उभारणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून १०००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांनी आपल्या परिसरातील नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) चा प्राधान्याने विचार करावा व नियमांचा अभ्यास करून किमान २० बेडचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील अंदाजे ५० गावांचे प्रस्ताव येणे अपेक्षित आहेत.

 
अशा गावातील प्रमुखांनी नजीकच्या आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची मदत घेऊन गावातील एखादी शाळा अथवा परिसरातील मंगल कार्यालयाचा सीसीसी उभारण्यासाठी विचार करावा अशी विनंती आ. पाटील यांनी केली आहे. तेर, ढोकी, बेंबळी, नायगाव, शिराढोण, मोहा, येरमाळा, मंगरूळ, काटी, तामलवाडी इत्यादी गावातील ग्रामस्थांशी त्यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या नियमावली प्रमाणे या केंद्रांना सहकार्य करण्यात येईल. तसेच जनतेचा सहभाग व लोकवाटा या उपक्रमासाठी महत्वाचा राहणार आहे. या प्रक्रियेत गरजेनुसार १००० खाटा उपलब्ध करण्याची जबाबदारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वीकारली आहे. अशा गावांमध्ये सीसीसी उभारल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

From around the web