कोरोनावरून शिवसेना- भाजपमध्ये 'सामना' रंगला !

 
कोरोनावरून शिवसेना- भाजपमध्ये 'सामना' रंगला !
मुंबई - एकीकडे राज्यातील जनता कोरोनामुळे भयभीत झाली असताना शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.  पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्‍यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही,  असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला होता.  त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी वेगळं काय केलं? असं म्हणत भाजपानं शिवसेनेच्या दंडुक्याला भाजपानं टोला लगावला आहे. 
काय म्हटलं आहे 'सामना'च्या  अग्रलेखात?
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्या घरात गेला आहे. हे लक्षण चांगले नाही. राज्यात दोनशे व संपूर्ण देशात हजारांवर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे, पण लोकांना या महामारीचे गांभीर्य खरंच समजले आहे काय? कोरोनाची समस्या अशी आहे की दाबण्यासाठी हिंदू-मुसलमान असा खेळ करूनही उपयोग नाही. मंदिर, मशीद, शाहीन बाग वगैरे पत्ते पिसूनही कोरोनावरील मात शक्य नाही. येथे सरकारला कष्ट करावे लागतील व जनतेला स्वयंशिस्त पाळावी लागेल. सरकारने २१ दिवसांचे `लॉक डाऊन’ जाहीर करूनही लोक रस्त्यावर उतरतात, गर्दी करतात. पुन्हा पोलिसांनी दंडुके उगारले तर हे कायद्याचे राज्य आहे काय असा प्रश्न विचारतात. होय, हे कायद्याचेच राज्य आहे. म्हणूनच पोलीस फक्त दंडुक्याचा वापर करीत आहेत. चीनसारखे राष्ट्र असते तर काय झाले असते सांगता येत नाही.
रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस दंडुके मारतात म्हणून सरकारवर टीका केली जात आहे. मग महाराष्ट्र वाचविण्यासाठी काय करायला हवे, याचेही मार्गदर्शन टीकाकारांनी करावे. इराणमध्ये रस्तोरस्ती, इटलीच्या चौकाचौकांत कोरोना रुग्णांचे मुडदे पडत आहेत. तसे मुडदे येथील रस्त्यांवरही पडू द्यायचे काय? डॉक्टरांवर ताण आहे तसा पोलिसांवरही आहे. कर्तव्य बजावणाऱया पोलिसांवर टीकेची झोड उठवून तुम्ही कोरोनाला बळ देत आहात. पण घसरलेल्या गाडीत बसणाऱया विरोधकांना हे सांगायचे कोणी? महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदारांनी (भाजप वगळून) त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री मदतनिधीत जमा केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी टाटा, बजाज, अझिम प्रेमजी, अंबानी अशा उद्योगपतींनी मोठे योगदान दिले, पण राज्यातील विरोधी पक्षाने त्यांच्या आमदार-खासदारांसाठी काय फर्मान काढावे? तर त्यांचे एक महिन्याचे वेतन त्यांनी भाजपच्या राहत कोषात जमा करायचे आहे. म्हणजे अशा संकट काळातही विरोधी पक्षाने त्यांचा सवतासुभा केला आहे. संकटात हे लोक एकत्र येण्यास तयार नाहीत. त्यांना मुख्यमंत्री व त्यांचा मदतनिधी आपला वाटत नाही. अशा विरोधी पक्षाला सामाजिक भान तर नाहीच, पण त्यांचे वागणे राष्ट्रीय एकोप्याच्या विरोधी आहे. म्हणूनच अशा कठीणप्रसंगी असे संकुचित विचारांचे लोक सत्तेवर नाहीत याचा महाराष्ट्राला अभिमान आहे.
त्यावर आता भाजपानं उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते, तेव्हा सत्तेत सहभागी असताना देखील त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऐवजी पक्षाच्या मदतनिधीस प्राधान्य देण्यासाठी आमदार, मंत्र्यांना ‘आदेश’ दिले होते. अग्रलेख लिहितांना संजय राऊत यांना याचा विसर पडला अशी टीका भाजपानं केली आहे. यासोबतच भाजपानं त्यावेळच्या एका बातमीचा फोटोही शेअर केला आहे.  

From around the web