कोरोना: उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम पुन्हा लागू 

कोरोना प्रतिबंधात्मक कार्यप्रणालीची काटेकार अंमलबजावणी करावी
 
कोरोना: उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम पुन्हा लागू
 -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश

 उस्मानाबाद -राज्यात  वाढत असलेल्या कोरोना साथीचा विचार करुन जिल्हयात 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आली आहे.या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीची कार्यप्रणाली (एस ओ पी )जाहिर करण्यात आली आहे.यासाठी नेमणूक केलेल्या अधिका-यांनी या कार्यप्रणालीची कडक अंमलबजावणी करावी,या कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमांतील तरतुदी प्रमाणे रितसर कार्यवाही करावी,असेही आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज एका आदेशाद्वारे जारी केले आहेत.

वैद्यकीय साहित्याची व्यवस्था नीट करा :

यापूर्वी वापर करण्यात आलेल्या डीसीएचसी सीसीसी इमारतींची तपासणी करुन त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत आणून ठेवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्राधिकृत केलेले अधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, (सा. बां. विभाग), जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व तहसीलदार सर्व मुख्याधिकारी न. प./न.पं. आणि वैद्यकीय अधिक्षक यांनी सर्व ग्रामीण रुग्णालयांनी याबाबत काम करावयाचे आहे.

खाजगी डॉक्टारांकरिता संशयीत रुग्णांची टेस्ट  :

      खाजगी डॉक्टरांकडून माहिती घेणे या डॉक्टरांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्याकडे उपचारासाठी येणा-या प्रत्येक रुग्णांची माहिती घेऊन त्यापैकी लक्षणे असलेल्या संशयीत रुग्णांची माहिती घेऊन त्यांना RTPCR चाचणी करुन घेणे आणि खाजगी रुग्णालयांना नियमित भेटी देणे.यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक,सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी (सर्व), वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालये यांनी कार्यवाही करावयाची आहे.

 गृह विलगीकरण/ अलगीकरण रुग्णांवर नियंत्रण ठेवणे :-सौम्य / अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोविड-19 बाधीत किंवा संशयीत रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी गृह विलगीकरण / अलगीकरणाची रितसर परवानगी घेऊन त्याबाबतच्या नियमांचे पालन करीत आहेत किंवा नाहीत याची तपासणी करण्यासाठी संपर्क शोधणे आणि अशा रुग्णांच्या तपासण्या करण्याचे काम  जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी,सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व मुख्याधिकारी न.प./न.पं. यांनी करावयाची आहेत.

        कोविड बाधीत (नवीन इंडेक्स रुग्ण) रुग्णांच्या संपर्कात असलेल्या कमीत कमी 20-30 सुरुवातीच्या 48 तासांच्या आत High Risk Contact व Low Risk Contact व्यक्तीचा शोध घेणे. त्यांना गृह विलगीकरण/अलगीकरण करणे. बाधीत रुग्णांना विषाणूचा संसर्ग कुठून झाला याबाबत त्या ठिकाणाचा / कार्यक्रमांचा शोध घेणे आणि त्यांची RTPCR तपासणी करणे. ही कामे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि सर्व न.प.मुख्याधिकारी यांनी करावयाची आहेत.

प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे:-   एखाद्या परिसरात कोविड-19 बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या परिसरातील व्यक्तींच्या हालचालीवर निर्बंध लागू करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात यावेत. तसेच या प्रतिबंधित क्षेत्रातील सूचनांचे उल्लंघन करणा-या व्यक्तींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी,सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आणि सर्व न.प.मुख्याधिकारी यांनी जबाबदारी पार पाडावयाची आहे.

सिटी स्कॅन सेंटर, खाजगी रेडीओलॉजी / पॅथोलॉजी लॅब इत्यादींची माहिती घेणे:- सिटी स्कॅन सेंटर, खाजगी रेडीओलॉजी / पॅथोलॉजी लॅब यांनी कोविड-19 संशयीत आढळून येणा-या रुग्णांचे अहवाल जवळच्या ग्रामीण रुग्णालय  आणि वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका/पंचायत यांना पाठवणे बंधनकारक करण्याबाबत कळविणे  आणि या ठिकाणी नियमित भेटी देणे. हे काम जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त ,औषध निरीक्षक  आणि सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी करावयाचे आहे.

 लग्नास 50 तर अंत्यविधीस 20 लोकांना परवानगी :

लग्न समारंभ व अंत्यविधी तसेच इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या  कार्यक्रमातील गर्दीचे  नियंत्रण करणे. लग्नसमारंभात एकावेळी जास्तीत जास्त 50 आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये 20 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.  लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. सर्व मंगल कार्यालये/लॉन्स/हॉल यांची अचानक तपासणी करण्यात यावी. तपासणीमध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्ती लग्नसमारंभात उपस्थित आढळल्यास तसेच हजर असलेल्या व्यक्ती विनामास्क असल्यास, सोशल डिस्टन्सींग आणि एसओपी चे पालन

करत नसल्यास मंगल कार्यालयाचे मालक, संचालक, आयोजक यांना नोटीसा देऊन  पाच हजार रुपयांचा  दंड करण्यात यावा. या नोटीसमध्ये पुन्हा अशाप्रकारचा भंग केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, याबाबत समज देण्यात यावी. दुस-यांदा पुन्हा उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास मंगल कार्यालयचे मालक, संचालक यांना   दहा हजार रुपयांचा दंड आकारावा. तसेच गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी  आणि 30 दिवसांच्या कालावधीसाठी सदरचे मंगल कार्यालय सिल करण्यात यावे.  ही कारवाई पोलीस विभाग,सर्व घटना व्यवस्थापक,सर्व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ,सर्व तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,सर्व पोलीस निरीक्षक, सर्व नगर परिषद मुख्याधिकारी,संबधित तलाठी,संबधित ग्रामसेवक आणि संबधित पोलीस पाटील यांनी करावयाची आहे.     

हॉटेल,बार कॅफेत 50 टक्के क्षमता :

    सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार (कॅफे, कॅन्टिन, डायनिंग हॉल, रिसॉर्ट, क्लब मधील बाहेरील  एफ आणि एल लायसन्सधारक युनिट/आऊटलेटसह) इत्यादी आदरातिथ्य सेवा 50 टक्के क्षमतेसह सकाळी 09.00 ते रात्री 09.00 पर्यंत सुरु राहतील याची खातरजमा करणे. याबाबतची कारवाई पोलीस विभाग, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व न.प.मुख्याधिकारी,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि सहायक आयुक्त अन्न प्रशासन विभाग यांनी करावयाची आहे.

शाळा,महाविद्यालय, शिकवणी वर्गातील दक्षता :

सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मास्कचा वापर करतात का, हे तपासणे, प्रत्येक वर्गात सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबण उपलब्ध ठेवणे. संशयीत विद्यार्थ्याची RTPCR चाचणी करुन घेणे. याबाबत कुलसचिव डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ,संबधित कॉलेजचे प्राचार्य, जि.प. चे शिक्षणधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांनी खबरदारी घेऊन कारवाई करावयाची आहे.

 खाजगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्रे इत्यादिच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग, मास्क वापर, सॅनिटायझरचा वापर होत आहे किंवा नाही यांची तपासणी करणे. तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी सॅनीटायझरचा वापर करणे, हात वारंवार धुणे इत्यादीबाबत सूचना निर्गमित करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे शिक्षणधिकारी माध्यमिक व प्राथमिक आणि सर्व नगर परिषद मुख्याधिकारी यांनी पार पाडावयाची आहे.

 
दुकानात एकाचवेळी पाच ग्राहकांना प्रवेश :

        गर्दीच्या ठिकाणी मार्केटमध्ये सर्व दुकानदार त्यांचे कर्मचारी, विक्रेते यांनी मास्क लावणे बंधनकारक करणे तसेच प्रवेश द्वाराजवळ सॅनिटायझर उपलब्ध ठेवणे. तसेच या ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी एका वेळी केवळ पाच ग्राहकच उपस्थित राहतील.

याबाबत कार्यवाही करावी. ही कारवाई पोलीस विभाग,सर्व न.प.मुख्याधिकारी, सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव,मंडळ अधिकारी (महसूल),तलाठी (महसूल), ग्रामसेवक (जि.प.) यानी करावयाची आहे.

शासकीय कार्यालयातील दक्षता :-  शासकीय कार्यालयात येणा-या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक करणे, सॅनिटायझर उपलब्ध ठेवणे अथवा हात धुण्यासाठी साबण उपलब्ध ठेवणे तसेच शासकीय कर्मचा-याने स्वत: मास्क वापरणे, दुपारचे जेवण एकत्रित न करणे. शासकीय कार्यालयात गर्दी करु नये. तसेच निवेदन, पत्र, अर्ज इत्यादी सादर करताना 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी कार्यालयात येवू नये. आणि शिष्टमंडळ आल्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत असल्यास परवानगी राहील. शक्यतो उक्त नमूद सर्व निवेदने ई-मेलद्वारे पाठवावे,याबाबत कल्पना दयावी ही जबाबदारी सर्व संबंधित कार्यालय प्रमुख आणि कार्यालयातील कोविड देखरेख अधिकारी यांनी पार पाडावयाची आहे

.मास्क न वापरल्यास दंड :

मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर पोलीस विभागामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फिरत्या पथकामार्फत या कार्यालयाचे आदेश दि. 21 सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये दंड आकारणी करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी दिले आहेत.याबाबतची कारवाई पोलीस विभाग,सर्व उप विभागीय दंडाधिकारी,सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी आणि सर्व न.प. मुख्याधिकारी यांनी करावयाची आहे.

 
वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक नसावी :

 एस.टी., बसेस, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, जीप (टॅक्सी) यांना अनुज्ञेय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यास बंदी करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कार्यवाही करणे तसेच मास्क शिवाय वाहनात प्रवेश नाकारणे. तसेच रेल्वेद्वारे विना मास्क प्रवास करणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणे ही कारवाई पोलीस विभाग,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, सर्व आगार व्यवस्थापक आणि संबंधित रेल्वे स्टेशन अधिकारी यांनी करावयाची आहे.

उद्याने सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंतच खुली :

सार्वजनिक उद्याने फक्त (सकाळी 5 ते 9) व्यायाम/मॉर्निंग वॉक करणा-यांसाठीच खुले ठेवावेत. या  ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे याबाबत न.प./न.पं. च्या सर्व मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करावी. सिनेमागृहामधील सर्व प्रेक्षक, कर्मचारी यांनी मास्कचा वापर करणे तसेच गर्दीचे नियम पाळणे याची खातरजमा करण्याची कारवाई सर्व ‍ न.प./न.पं. च्या सर्व मुख्याधिकारी, सर्व करमणूक कर निरीक्षक आणि संबंधित व्यवस्थापक यांनी करावी.

 
क्रीडांगणे खेळाडूंना केवळ क्रीडा प्रकारांचे सरावासाठी उपलब्ध करुन देणे, मोठ्या स्पर्धा आयोजित न करणे व प्रेक्षकांना क्रीडांगणावर परवानगी न देणे. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी आणि सर्व तालुका क्रीडा अधिकारी यांनी कारवाई करावी.

मिरवणूका,यात्रा स्पर्धा घेण्यास परवानगी देऊ नये :

मिरवणूका, यात्रा, स्पर्धा, मोर्चा, उपोषणे व इतर सामुहिक कार्यक्रमांस परवानगी देण्यात येवू नये. राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांस मनाई करण्यात येत आहे. पोलीस विभाग,सर्व उपविभागीय दंडाधिकारी,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,सर्व तालुका कार्यकारी दंडाधिकारी आणि सर्व पोलीस निरीक्षक यांनी याबाबत कारवाई करावी.

बस स्टँड/ रेल्वे स्टेशन/ सार्वजनिक प्रसाधन गृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणांचे  वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्याचे काम रा.प.म.च्या विभाग नियंत्रक,आगार व्यवस्थापक ,संबंधित रेल्वे स्टेशन अधिकारी, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाचे आहे.

 या प्रमाणे नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना कोरोना‍ विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने सर्वसाधारणपणे जबाबदारी देण्यात आलेली आहे. सर्व समन्वय अधिकारी यांना देण्यात आलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच नियुक्त

अधिकाऱ्‍यांनी त्यांच्या अधिनस्त मनुष्यबळ  आणि साधनसामुग्रीचा यथोचित वापर करुन त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी. तसेच नियुक्त अधिका-यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार आपल्या कार्यालयातील इतर अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करावी.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश, नियमावली, कार्यप्रणाली (SOP) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. या आदेश आणि जिल्ह्यातील कोविड-19 बाबतची माहिती www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर Covid-19 Dashboard या सदराखाली उपलब्ध आहेत.

या  आदेशाचे सर्व नागरिकांनी पालन करावे. प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी पोलीस प्रशासन/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी/आरोग्य अधिकारी/गट विकास अधिकारी/संबंधित नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचायत यांच्या मार्फत काटेकोरपणे करण्यात यावी. या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह, संस्था अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी म्हटले आहे.

From around the web