कोरोना : लॉकडाऊन नियमावलीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ

उस्मानाबाद - ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमावलीत आता ३१ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे मैलारपूर - नळदुर्गची २८ जानेवारी रोजी भरणारी श्री खंडोबा यात्रा रद्द होण्याची शक्यता आहे.
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या नियमावलीत आता ३१ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. करोनाचं संकट अधिक वाढू नये यासाठी कडक निगराणी आणि काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, नुकतेच ब्रिटनहून भारतात परतलेले काही लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ही खबरदारी घेतली जात आहे.
गृह मंत्रालयाने म्हटलं की, “कन्टेंन्मेंट झोनचे सावधगिरीने सीमानिश्चिती करणे सुरुच राहिल. कन्टेंन्मेंट झोनमध्ये सुरुवातीपासून निश्चित करण्यात आलेल्या संसर्ग रोखण्याच्या उपायांचे कडक पद्धतीने पालन केलं जाईल. कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंसिंग राखण्यासारख्या नियमांचे सक्तीने पालन करावे लागेल.”
श्री खंडोबा यात्रा रद्द होण्याची शक्यता
मैलारपूर - नळदुर्गची श्री खंडोबा यात्रा पौष पौणिमेला भरते. यंदा २८ जानेवारीला पौष पौणिमा आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमावलीत आता ३१ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे श्री खंडोबा यात्रा रद्द होण्याची शक्यता आहे.
या यात्रेस दरवर्षी किमान ५ लाख भाविक उपस्थित राहतात. मात्र यंदा या यात्रेवर कोरोनाचे सावट दिसत आहे.