उस्मानाबादेत कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही अवहेलना 

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पार्थिवाचे पीपीई किट फाटकेच 
 
उस्मानाबादेत कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही अवहेलना
 अंत्यसंस्कार करणाऱ्यांसह कुटुंबियांचा जीव धोक्यात 

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून या महाभयंकर विषाणूने आपल्या कवेत कवटाळून अनेकांना  गिळंकृत केले आहे. या महामारीच्या काळात आरोग्य विभागाचा फज्जा उडाला असून, दररोज किमान २० जण मृत्यू पावत आहेत. मात्र कोरोना रुग्णाची  मृत्यूनंतरही  अवहेलना सुरूच आहे. 


जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे पार्थिव ॲम्बुलन्समध्ये ठेवताना मृत बॉडीला जी पीपीई किट पॅक करण्यासाठी वापरण्यात येते. त्यापैकी बऱ्याच किट या फाटलेल्या आहेत. त्यामुळे पूर्णपणे मृतदेह पॅकींग होत नसल्याने फाटलेल्या छिद्रातून या जंतूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून अंत्यसंस्कार  करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतणारी आहे.  


कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यावर आहे. स्वच्छता विभागाचे कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावित आहेत. त्या कर्मचाऱ्यांना देखील एक कुटूंब आहे. याचे  भान आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरणार आहे. 

दररोज किमान १५ रुग्णावर अंत्यसंस्कार 

उस्मानाबादेत कोरोनामुळे दररोज किमान १५ ते २० जण मृत्यू पावत आहेत. त्यांच्यावर कपिलधारा स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार केले जात आहेत. हे विदारक चित्र मन हेलवणारे ठरत आहे. उस्मानाबादचा  मृत्यू दर राज्यात  तिसरा क्रमांकावर असून, याला उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सकांचा भोंगळ कारभार कारणीभूत ठरत आहे. वशिलाचे तट्टू असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांची तात्त्काळ उचलबांगडी  करावी, अशी मागणी होत आहे. 


 अस्तव्यस्त किटमुळे कोरोना विषाणूंचा फैलाव !

जिल्हा शासकीय रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यासाठी वापरण्यात येत असलेले वापरात आलेल्या पीपीई किट व इतर टाकाऊ वस्तू रुग्णालयाच्या पोर्चच्या बाजूस असलेल्या शवविच्छेदन (पोस्टमार्टम) विभागाकडे असलेल्या रस्त्यावर कचऱ्याचा ढीग लागलेला आहे. विशेष म्हणजे या बाजुस लागून मोठी लोकवस्ती आहे. यामध्ये अजिंठा नगर, बौध्द नगर या भागाचा समावेश आहे. 

सध्या याच भागात कोरोनाचा फैलाव होत आहे. तर अनेकांना कोरोनाची लागण होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज देखील मोठ्या प्रमाणात या भागात कोरोना चे रुग्ण सापडत असल्यामुळे  जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन तेथील कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावणे काळाची गरज बनली आहे.

From around the web