"डॉक्टर डे" निमित्त आ. राणा जगजितसिंह पाटील यांची भावनिक पोस्ट
उस्मानाबाद - तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज खास डॉक्टर डे निमित्त फेसबुक पेजवर भावनिक पोस्ट लिहून आपल्या आई - वडिलांविषयी प्रेम व्यक्त केले आहे.
माजी गृहमंत्री आणि माजी खासदार डॉ. पदमसिंह पाटील हे राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्व. ते राजकारणात येण्यापूर्वी डॉक्टर होते. त्यांना साथ मिळाली त्यांची डॉक्टर पत्नी चंद्रकला देवी पाटील यांची. चंद्रकला देवी या स्वर्गवासी झाल्या आहेत.
आमदार राणा जगजितसिंह पाटील हे डॉ. पदमसिंह पाटील चिरंजीव. आपल्या वडिलांचा राजकीय वारसा ते चालवीत आहेत. आज डॉक्टर डे आहे आणि त्यानिमित्त त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.
...
आई-वडिलांमुळेच डॉक्टर म्हणजे काय, हे खऱ्या अर्थाने समजू शकतो..
वडील श्री.पद्मसिंह पाटील साहेब आणि आई स्व.चंद्रकला देवी या दोघांनाही एक डॉक्टर म्हणून समर्पित स्वरूपात अत्यंत जवळून पाहता आले. लोकांचा जीव वाचविण्यासाठी अनेकवेळा त्यांना कितीतरी महत्वपूर्ण गोष्टींचा त्याग करावा लागला. रुग्णांसाठी त्यांची तळमळ जवळून पाहिली आहे.
माणसाच्या आयुष्याची दोर परमेश्वरानंतर डॉक्टरांच्याच हातात आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. पण त्या प्रत्येक हातामागे एक भावनिक, संवेदनशील मन असते हे आपण बऱ्याचदा विसरतो.
आयुष्याची ज्योत प्रज्वलित राहण्यासाठी डॉक्टर्स प्राणपणाने लढत असतात. वैयक्तिक जीवन, कुटूंब या सगळ्यांपासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करत राहणे निश्चितच सोपे नाही. अनेकवेळा त्यांच्या हाताबाहेर परिस्थिती जाऊ शकते. अशावेळी त्यांच्या कर्तव्याचा आदर करणे, परिस्थिती समजून घेणे महत्वाचे आहे. कारण ते लढत आहेत म्हणून आपण मोकळा श्वास घेऊन शकत आहोत. मागील वर्षभर आपण तोच अनुभव घेत आहोत... नाही का ?
- राणा जगजितसिंह पाटील