उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा गटबाजीचे 'ग्रहण' !

 
उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा गटबाजीचे 'ग्रहण' !


उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा गटबाजीचे ग्रहण लागले आहे.माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या  कार्यकर्त्यात सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहात असून, अन्य तालुक्यातील कार्यकर्त्यांची यामुळे मोठी कोंडी झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत याच गटबाजीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे गटबाजीला कंटाळून शिवसेनेत गेले, त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा चव्हाण समर्थक धीरज पाटील यांच्याकडे आली तर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माजी मंत्री आणि  काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष  बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील यांच्याकडे आली.  यातील जिल्हाध्यक्षपद हे अपघाताने तर युवक जिल्हाध्यक्षपद हे वरदहस्ताने पदरी पडल्याने याचा विशेष फायदा पक्षाच्या वाढीसाठी अथवा बांधणीसाठी झाल्याचे अद्यापपर्यंत तरी दिसून आलेले नाही. त्यातत मागील काही काही कालावधीपासून काँग्रेसअंतर्गत प्रमुख दोन गटात सुरू असलेल्या ओढाताणीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मात्र गोची होत आहे.

परवा उस्मानाबादेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  यानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले . यावेळी जे बॅनर छापण्यात आले होते, त्यावर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा फोटो नव्हता. त्यावर चव्हाण समर्थक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केली.तुळजापूरचे कार्यकर्ते बसवराज पाटील यांचा तर उमरगा- लोहारा तालुक्यातील कार्यकर्ते मधुकरराव चव्हाण यांचा फोटो बॅनरवर प्रसिद्ध करीत नाहीत. त्यामुळे अन्य तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली आहे.


एकीकडे पक्षाची वाताहत होत असताना दुसरीकडे नेत्यांचे व्हीआयपी कल्चर आणि घरानेशाही पक्षाच्या वाढीस बाधक ठरत असल्याचीही चर्चा होत असून राज्यात सत्तेत असलेली काँग्रेस जिल्ह्यात मात्र अपवादात्मक संस्था वगळता प्रमुख ठिकाणी सत्तेबाहेर असल्याने याची जबाबदारी कोणाची असाही प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे.


काँग्रेसला मागील काही वर्षात मात्र वर्चस्व व स्वप्रतिष्ठेच्या ओढाताणीत चांगलीच मरगळ आली आहे. पूर्वीपासून सतत काँग्रेसची सूत्रे पक्षापेक्षा व्यक्तीधार्जीण पद्धतीने कधी तुळजापूर तर कधी उमरगेकरांच्या समर्थकांकडे नेण्यासाठी ओढाताण सुरू राहिली. मागील कालावधीत दोन आमदार, मंत्रीपद, जिल्हा परिषद, अनेक पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा बँक अशा महत्वाच्या संस्थावर सत्तास्थानी असलेल्या काँग्रेसला सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.


सध्या राज्याच्या सत्तेत काँग्रेस असली तरी त्याचा लाभ उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना होत नाही. आपण सत्तेत आहोत कि विरोधात हेच त्यांना उमगत नाही, त्यात मधुकराव चव्हाण आणि बसवराज पाटील यांच्या कार्यकर्त्यात मोठी चढाओढ लागली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष अधिक कमजोर होत आहे. काँग्रेसला लागलेले गटबाजीचे हे 'ग्रहण' केव्हा सुटणार ? अशी विचारणा कुणाकडे करावी ? हाच प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे.



From around the web