दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा -ॲड रेवण भोसले

 
दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा -ॲड रेवण भोसले

उस्मानाबाद  - सणासुदीच्या तोंडावर परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन ,तूर इत्यादीसारखी पिके डोळ्यादेखत उध्वस्त होऊन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पिकांची झालेली नुकसान भरपाई त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

 जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांना सरसकट अतिवृष्टीचा निकष लावून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी परंतु शासनाने जाहीर केल्याप्रमाणे  पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून काहीच पावले उचलली जात नाहीत. सरकार फक्त झोपेचे सोंग घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कसलीही कारवाई करत नाही. शासनाने मदतीचा निर्णय घेतला परंतु सरकारी आदेश लागू केलेले नाहीत .त्यातच आता विधान परिषदेची आचारसंहिता लागू झालेली आहे. 


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पीक पाहणी करण्यासाठी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते हे सर्वजणच येऊन शेतकऱ्यांशी संवाद  साधताना फोटो काढले तसेच सतत दोन दिवस चॅनलवर सातत्याने बातम्या सुरूच राहतील याची व्यवस्था केली व आपण शेतकऱ्यांचे किती कैवारी आहोत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करून निघून गेले. त्यातच शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत जाहीर करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची टिंगल-टवाळी केली आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी  अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट 50 हजार रुपये हेक्टरी तर फळबागासाठी एक लाख रुपये हेक्टरी नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.

From around the web