कोरोना लसीबाबत तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे 

पहीला डोस कोव्हॅक्सिनचा आणि दुसरा डोस कोव्हीशिल्डचा, आपण घेऊ शकतो का ?
 
कोरोना लसीबाबत तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

मुंबई - १८ वर्ष  पूर्ण झालेल्या सर्व तरुणांना आणि त्याच्या पुढील सर्व  वयोगटातील लोकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे  देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण अभियान सुरू होईल. त्या पार्श्वभूमीवर लस टोचून घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाचं निरसन होणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर या लसीकरणाबाबत पुढील शंकाचे निरसन करण्यात आलेल्या आहेत. लस टोचून घेण्यापूर्वी नक्की वाचा...

कोरोनावर कोणती लस चांगली... कोव्हॅक्सिन की, कोव्हिशिल्ड?

संशोधनांती असं लक्षात आलं आहे की, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्हीही लसी परिणामकारक आहेत. नागरिकांना दोन्ही लसी उपलब्ध झाल्या पाहिजेत. कारण, कोरोनासारख्या गंभीर आजारात मृत्यू होण्यापासून बचाव करतात.

पहिला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा घेऊ शकतो का?

नाही. कोरोनाच्या लसीकरणात दोन्ही वेळचे डोस एकच असावेत.

हार्ट बायपास झालेल्या रुग्णांना कोरोनाची लस देऊ शकतो का?

हो. हार्ट बायपास झालेल्या रुग्णांना कोरोनाची लस टोचली तरी चालते.

कोरोनाची लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे का?

याविषयी आपल्या देशात मर्यादित डेटा आहे. परंतु, अमेरिकेच्या सेंट्रल फाॅर डिसीज कंट्रोल या एजन्सीनुसार ९९.९९ टक्के लोकांना कोरोनाची लस घेतल्यानंतर बाधा झालेली नाही.

संबंधित रुग्णाला अ‍ॅलर्जी असेल तर, कोरोनाची लस घ्यावी का?

अशावेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्या. कारण, अ‍ॅलर्जीमध्ये विविध प्रकार असतात. संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे जावे. तुमच्यावर लसीनंतर अ‍ॅलर्जी झाली असेल तर विविध उपाय आणि उपचार करू शकतील.

कोरोनाच्या लसीकरणानंतर कोणती लक्षणं दिसतात?

कोरोनाची लस घेतल्यानंतर ताप येणे, थंडी वाजणे, कणकण येणे, अशक्तपणा जाणवणे, अशी लक्षणं दिसू शकतात. अशावेळी 'पॅरासिटामाॅल' घ्या. दोन-तीन दिवसांत तुम्ही ठीक होऊन जाल. लसींमुळे कोणताही मोठा परिणाम होणार नाही. ज्या ठिकाणी इन्जेक्शन घेतलं आहे तिथली जागा लाल होईल आणि थोड्याशा वेदना होतील.

समजा, मी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे आणि नंतर माझ्या कुटुंबात एखादा सदस्य कोरोनाबाधीत झाला. तर, दुसरा डोस घेताना कोणती खबरदारी घ्यावी?

पहिल्या डोसनंतर जी कोणती तारीख ठरलेली आहे, त्या तारखेला दुसरा डोस घ्या.

ज्यांना पूर्वी विविध आजार झाल्यांची किंवा होऊन गेल्याची नोंद आहे, अशा रुग्णांनी कोरोनाची लस घेतली तर चालते का?

जेव्हा तुम्ही कोरोनाची लस घेण्यासाठी जाल, तेव्हा डाॅक्टरांचा सल्ला घ्या किंवा त्यांना कल्पना देऊ जा.

एखाद्याला थायरॉईडचा त्रास असेल तर कोरोनाची लस घेऊ शकतो का?

हो. त्यांना लस घेण्यात कोणतीही अडचण नाही.

कोरोनाची लस घेतल्यानंतर इतर कोणत्या चाचण्या करणं गरजेचं आहे?

कोणत्याही चाचणची गरज नाही. फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगात कुठेही त्याची गरज नाही. जर तुम्हाला कोरोनाची लक्षणं जाणवत असतील, असं वाटत असेल तर कोरोनाची लस घेण्यापूर्वी एका कोरोनाची चाचणी करून घ्या.

ज्या ठिकाणी पहिला डोस घेतला त्याच ठिकाणी दुसरा डोस घ्यायचा का?

असं काहीही नाही. तुम्ही तुमचा दुसरा डोस कोणत्याही लसीकरण केंद्रात घेऊ शकता.

कोरोना लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

नाही. भारतात निर्माण झालेल्या लसींमध्ये थेट कोरोनाचे विषाणू नसतात, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. लस घेतल्यानंतर निष्काळजीपणाने वागू नका. मास्क वापरणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रुग्णांच्या शरीरात पूर्ण क्षमतेने प्रतिकारशक्ती कार्यरत होते.

पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये फरक आहे का?

आजिबात नाही.

रक्त पातळ होण्याची औषधे सुरू असतील तर, लसीकरणापूर्वी ती औषधं घेणं थांबवावं का?

नाही. तुमची सुरू असलेली औषधं नियमित घ्या.

पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली, तर काय करावं?

दुसरा डोस घ्या. १-२ आठवड्यानंतर रिकव्हर होऊ शकता. जर पहिल्या डोसनंतर कोरोना झाला तर २८ दिवसांनी कोरोनातून संपूर्ण रिकव्हर होऊ शकता.

स्तनपान करणाऱ्या महिलांना आणि गरोदर मातांना कोरोनाची लस देऊ शकतो का?

नव्या नियमांनुसार अजूनतरी यासंबंधी सल्ला देण्यात आलेला नाही.

हृदयविकाराचे आजार असणारा रुग्ण लस घेऊ शकतो का?

हो.

कर्करोगातून बरे झालेल्या रुग्णाला लस घेता येते का?

हो. रुग्णाला मागे काही आजार होऊन गेले असतील, तर ते रुग्ण लस घेऊ शकतात.

दुसऱ्या डोसनंतर पाय दुखू लागले तर... ही गोष्ट सामान्य आहे का?

पाय दुखण्याची विविध कारणं असू शकतात, त्यामुळे अशावेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

कोरोनाची लस ही इतर विषाणुंच्या संसर्गासाठी उपयुक्त ठरते का?

कोरोनाची लस ही केवळ कोरोना रुग्णांसाठी दिली जात आहे. इतर विषाणुंच्या संसर्गासाठी ती दिली जाणार नाही. कारण, इतर संसर्गासाठी विविध लसी उपलब्ध आहेत.

ज्येष्ठांना दुसरा डोस घेण्याची भीती वाटल्यास, दुसरा डोस घेतला नाही, तर चालेल का?

नाही. कारण, दोन्ही डोस घेतल्याशिवाय संपूर्ण परिणाम जाणवणार नाही. एक डोस पुरेसा नाही.

लसीकरणानंतर नैसर्गिक प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) नष्ट होतील काय?

नाही. कोरोनाची लस ही अधिक प्रतिपिंडे तयार करते. शरीरातील नैसर्गित प्रतिपिंडांवर कोणताही परिणाम करत नाही. उलट शरीरात अधिक प्रतिपिंड निर्माण होतात.

कोरोनामुक्त होऊन प्रतिपिंड तयार झाली आहे, तर कोरोनाची लस घेणं आवश्यक आहे का?

हो. कोरोनामुक्त झाल्यानंतरही लस घेणे आवश्यक आहे. कारण, प्रतिपिंडे जास्त काळ टिकू शकत नाहीत.

काही कारणास्तव दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर चालते का?

हो. काही हरकत नाही. परंतु, दुसरा डोस घेणे महत्वाचे आहे. ४, ६ किंवा ८ आठवड्यानंतर दुसरा डोस घेणे जास्त चांगले असते.

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर विकार असणाऱ्यांना लस घेणं गरजेचं आहे का?

हो. अशा लोकांनाच कोरोनाचा जास्त धोका आहे. त्यांनी तर अग्रक्रमाने लस घ्यावी.

पहिला डोस परदेशात आणि दुसरा डोस स्वदेशात घेतला तर चालतो का?

हो. ते शक्य आहे. पण, तोच एक पर्याय शिल्लक असेल तर...

कोरोनाची लस घेतल्यानंतर कोणतेच साईड इफेक्ट दिसले नाही तर, ती लस प्रभावी असते का?

हो. नक्कीच.

From around the web