उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेतील आठ पोलिसांच्या नियुक्त्याही रद्द होण्याची शक्यता

उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलातील बदल्यांच्या घोळाची औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांनी गंभीर दखल घेतली असून, स्थानिक गुन्हे शाखेतील आठ पोलिसांच्या नियुक्त्याही रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
उस्मानाबादच्या माजी पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी नागपूरला जाता - जाता चार वेगवगेळ्या पोलीस बदल्यांची ऑर्डर काढली होती, या बदल्या करताना सर्व नियम धाब्यावर बसवले होते. त्यामुळे १३ पोलिसांच्या आणि पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या.
याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने बातम्या प्रकाशित केल्या होत्या तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील आठ पोलिसांच्या नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने कश्या करण्यात आल्या हेही नमूद केले होते.
या प्रकरणी औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांनी गंभीर दखल घेतली असून, बदल्या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना सोमवारी औरंगाबादला बोलावून खरडपट्टी केली होती, यावेळी चौकशीला सामोऱ्या गेलेल्या अधिकाऱ्यानी हात वर करून माजी पोलीस अधीक्षक नीवा जैन यांच्यावर खापर फोडले होते.
स्थानिक गुन्हे शाखेतील नियुक्ती म्हणजे क्रीम पोस्टिंग समजली जाते. येथे अनेक वर्षे काम केलेल्या पोलिसांनी लाखो रुपयांची माया जमविली आहे. वसुली मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळेच माजी पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी ज्या आठ पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्त्याचा आदेश काढला त्यात 'अर्थपूर्ण ' व्यवहार झाल्याचा संशय बळावला आहे. ही नियुक्ती करताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत.
आठ पोलिसांची नियुक्ती वादात
उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेत वसुली करणाऱ्या काही पोलिसांच्या बदल्या करण्याचा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांनी दिले होते , पण मॅडमनी दुसऱ्याच चार पोलिसाची बदली करून त्यांना बळीचा बकरा बनवले आणि आठ पोलिसांची नियुक्ती केली , ज्यात दोन पोलिसांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे.