उस्मानाबाद - सोलापूर रेल्वेमार्गाचे जमीन मोजणीचे काम सुरु

उस्मानाबाद-तुळजापुर-सोलापुर रेल्वेमार्गावर केंद्राचा पुन्हा अन्याय - खासदार ओमराजे 
 
RELVE

सोलापूर : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या 84 किमीच्या रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळाली आहे. ता. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी बजेट सादर केले. यामध्ये सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी 10 कोटी रुपये मिळाल्याने रेल्वेच्या कामास गती मिळत आहे. उस्मानाबाद येथून जमीन मोजणीचे कामास सुरूवात झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.


पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारत अशा तीन शहरांना जोडला जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून सोलापूर -उस्मानाबाद मार्ग ओळखला जाणार आहे. मार्गातील लाईन मार्कींगचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. रेल्वे विभागातील अधिकारी आणि भूमिअभिलेख कार्यालया यांचया संयुक्‍त विद्यमाने मोजणीचे काम सुरु असून त्यासाठी बाधीत जमिनीच्या शेतक-यांनी प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रेल्वेचे आणि भूमिअभिलेख अधिका-यांनी केले आहे. 

उस्मानाबाद तालुक्‍यातील 9 गावांतील जमिनी जाणार आहे. या तालुक्‍यातील 9 ही गावात रेल्वेकडून डिमार्केशन करण्यात आले आहे. उपळा येथील गावातील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. तर सांजा येथे मोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. उर्वरित गावातील मोजणीची प्रक्रिया सुरु लवकरच सुरु होणार असल्याचे यावेळी सांगण्यता आले. ज्या गावात मोजणी होणार आहे त्यापूर्वी त्या गावात नोटीस दिली जाते. मात्र तरीही अनेक शेतकरी मोजणीच्या वेळी उपस्थित राहत नसल्याने मोजणीचे काम कासव गतीने सुरु आहे. मात्र या मार्गाच्या कामासाठी उस्मानाबाद आणि तुळजापूर येथे प्रक्रिया सुरु झाली खरी मात्र अद्याप सोलापूर जिल्हयात या कामास कोणतीही सुरुवात झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उस्मानाबाद-तुळजापुर-सोलापुर रेल्वेमार्गावर केंद्राचा पुन्हा अन्याय - खासदार ओमराजे 

omraje

 आई तुळजाभवानी हे साडेतीन शक्ती पिठापैकी एक आहे, त्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या दारात येऊन शब्द देऊनही तो पाळला गेला नाही. आई तुळजाभवानीशी प्रतारणा करणाऱ्या केंद्रातील सत्ताधीशाना अद्दल घडल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लगावला. अर्थसंकल्पात उस्मानाबाद तुळजापुर सोलापुर रेल्वे मार्गासाठी फक्त दहा कोटीची तरतुद केल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  तिखट प्रतिक्रिया नोंदविली आहे.

प्रचाराला येताना लोकप्रिय घोषणा करायच्या व नंतर त्याची प्रतिपुर्ती करण्याची वेळ आली की तिथे पक्ष, सत्ता याचा विचार करायचा अशी दुटप्पी भुमिका भाजप सरकारने घेतली आहे. शिवसेनेच्या खासदाराला याचे श्रेय मिळु नये यासाठी भाजपाच्या नेत्यांचा कुटील डाव असुन जनता हुशार आहे. त्यांना आता सर्वकाही समजत असल्याचा टोला ओमराजे यानी लगावला. मार्गाला एक हजार कोटीची गरज असुन गेल्या तीन अर्थसंकल्पात याला मिळालेला निधी पाहुन त्याचे भुसंपादन तरी होईल का असा सवाल खासदार ओमराजे यांनी केला आहे. 

पहिल्या वर्षी पाच कोटी, दुसऱ्या वर्षी 20 कोटी तिसऱ्या अर्थसंकल्पात तर अवघे दहाच कोटी रुपये दिले आहेत. केंद्रातील भाजपचे सरकार राज्यात सत्ता गेल्यामुळे राजकीय द्वेषापोटी निधी देण्यामध्ये कुचराई करताना दिसत आहे. त्यात जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्या कारणाने या ठिकाणी निधी दिल्यास त्याचा फायदा खासदारांनाच होईल अशी संकुचित प्रवृत्ती या भाजपच्या नेत्यांची आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्ह्याला विकासापासुन दुर नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा करुनही तीन वर्षात त्याचे भुसंपादन सुध्दा होत नसल्याने या मार्गाबाबत जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन जनतेमध्ये रोष निर्माण व्हावा असा हेतु भाजपाचा आहे. जनता तुम्ही समजताय तेवढी दुधखुळी राहिलेली नाही. देशाच्या सर्वोच्च सभागृहात रेल्वेमार्गासाठी निधी द्यावा अशी कित्येकवेळा विनंती करुनही हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येत आहे. आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र तीर्थक्षेत्राला रेल्वेने जोडण्याचा शब्द देणाऱ्यांनी तो पाळायला हवा होता. आई तुळजाभवानी मातेची सुध्दा कदर भाजपच्या नेत्यानी केली नाही यासारख दुर्देव नसल्याचे मत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

From around the web