उस्मानाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांना 'कारणे दाखवा' नोटीस
उस्मानाबाद - शासकीय स्त्री रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची लूट करणाऱ्या डॉ.दिग्गज दापके याला पाठीशी घालणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय केशव पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे.
शासकीय स्त्री रुग्णालयात तीन वर्षांपूर्वी म्हणजे १९ फेब्रुवारी २०१९ रोजी बाळासाहेब सुभेदार यांच्या पत्नी लक्ष्मी सुभेदार यांना बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.दिग्गज दापके यांनी बाळाचा जन्म झाल्यानंतर कावीळ झाल्याचे खोटे सांगितले आणि त्यांच्या खासगी रुग्णालयात तपासणी करण्यासाठी चिठ्ठी दिली. जिल्हा शासकीय रुग्णलयात तपासणीची सुविधा असताना, डॉ.दिग्गज दापके हे रुग्णांना स्वतःच्या खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखवून रुग्णाची लूट करीत होते. त्याचे स्टिंग ऑपरेशन देखील सुभेदार यांनी केल्यानंतर उस्मानाबाद लाइव्हवर प्रसारित करण्यात आले होते.
याप्रकरणी सुभेदार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे डॉ.दिग्गज दापके यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली, या समितीने गोलमाल अहवाल सादर करून डॉ.दिग्गज दापके यांना पाठीशी घालण्याचे काम केले. त्यानंतर सुभेदार यांनी त्याला हरकत घेऊन पुनर्र चौकशी करण्याची मागणी केली.
त्यानंतर नव्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली असता, डॉ.दिग्गज दापके यांनी सुभेदार यांच्यासह अनेक लोकांना खासगी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवून लूट केल्याचे निष्पन्न झाले. पण दापके यांच्यावर काय कारवाई करणार ? याचा सुपष्ट अहवाल दिला नाही.
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय केशव पाटील यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. आदेशाचे पालन न केल्याबद्दल पाटील यांचे विरूध्द आरोग्य संचालक यांना कार्यवाही प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव पाठवण्याची तंबी दिली आहे. त्यामुळे पाटील यांचे धाबे दणाणले आहेत.