उस्मानाबाद जिल्ह्यातील 259 अतिक्रमित शेतरस्ते घेणार मोकळा श्वास

शेतरस्ते खुले करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे धडक मोहिम सुरु

 
उस्मानाबाद जिल्ह्यातील 259 अतिक्रमित शेतरस्ते घेणार मोकळा श्वास

उस्मानाबाद -  ग्रामीण भागामध्ये शेताकडे जाण्यासाठी गाडीमार्ग व पायमार्ग हे परंपरेने आणि वहीवाटीने निश्चित झालेले आहेत. या सर्व रस्त्यांच्या नोंदी महसूली अभिलेखात पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. वाढती लोकसंख्या तसेच जमीनीच्या वाढत्या किंमती यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतरस्ते आणि शेतीकडे जाणारे पायमार्ग यावर अतिक्रमण केले आहेत. यामुळे एकतर हे रस्ते अरुंद झाले आहेत किंवा वापरात राहिले नाहीत. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना रस्त्यांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रस्त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वादविवाद होऊन काही ठिकाणी यातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 259 अतिक्रमित शेतरस्ते खुले करण्याची धडक मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे हे शेतरस्ते आता मोकळा श्वास घेतील.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी आणि शेतातील मालवाहतूक करण्यासाठी अतिक्रमण मुक्त रस्ते आवश्यक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गावनकाशाप्रमाणे अतिक्रमण झालेले तसेच बंद झालेले गाडी रस्ते,शेतरस्ते शेतावर जाण्याचे पायमार्ग लोकसहभागाद्वारे मोकळे करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहिम हाती घेतली आहे.

या मोहिमेअंतर्गत सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील अतिक्रमण करण्यात आलेले आणि बंद झालेले शेतरस्ते तसेच पायमार्ग यांची माहिती गावनिहाय संकलित करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये जे रस्ते शेतरस्ते अतिक्रमण मुक्त्‍ा करावयाचे आहेत असे 259 रस्ते जिल्हा प्रशासनातर्फे निश्चित करण्यात आले आहेत. दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे करण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतरस्त्याचे अतिक्रमण काढण्यसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व मंडळ अधिकारी यांनी एका आठवड्यात शिवारफेरी घेऊन अशा सर्व रस्त्यांची गावकऱ्यासमवेत पाहणी करुन आणि त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे करुन देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे यावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून रस्ते मोकळे करुन न दिल्यास अतिक्रमित आणि बंद झालेले रस्ते मोकळे करण्याबाबत उपलब्ध कायदेशीर तरतूदींचा आधार घेऊन हे शेतरस्ते मोकळे करण्यात येतील,असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमण मुक्त रस्त्यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेअंतर्गत मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे खेडेगावातील शेताकडे जाण्यासाठी असणारी रस्त्यांची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परस्परांमध्ये   वाद न करता गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित आणि बंद झालेले गाडी रस्ते,पाणंद,पांधण,शेतरस्ते,शिवाररस्ते आणि शेतावर जाण्याचे पायमार्ग लोकसहभागातून मोकळे करण्यासाठी महसूल प्रशासनास सहकार्य करावे. याबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी केले आहे. 

From around the web