शेतकऱ्यांची वीज तोडणे त्वरित थांबवा !

वीज तोडणी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ.... 
 
rana
- आमदार राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद  -    अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना वीज बिलापोटी सरसकट वीजपुरवठा बंद करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. एकीकडे तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांचा कळवळा दाखवायचा तर दुसरीकडे सक्तीची वीज वसुली सुरू करून या हाताने दिलेले त्या हाताने व्याजासकट वसूल करण्याचा गोरखधंदा सरकारने सुरू केला आहे. रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत असून शेतकर्‍यांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. त्यांच्या आक्रोशाचा विस्पोट होण्याअगोदर सक्तीची वीज वसुली बंद करून कृषि पंपांचा तोडलेला वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे आदेश तत्परतेने व्हावेत, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी आज महाविकास आघाडी साकारला दिला आहे.

राज्यातील सरकारी कार्यालये, मंत्र्यांचे बंगले, साखर कारखाने, खाजगी फार्म हाउस मधील वीजबिलांच्या थकबाकीने उच्चांक गाठला असताना त्याकडे दुर्लक्ष करून दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना काळातील टाळेबंदीमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या शेतकरी व गरीब कुटुंबाची ठाकरे सरकारने फसवणूक केली आहे. धनिक थकबाकीदारांना अभय देत महाविकास आघाडी सरकारने गरीब शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा तगादा लावला आहे.

यावर्षी अगदी एप्रिल पासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे, शेत जमिनीचे, घरांचे व दुकानांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. दुर्दैवी जिवीतहानीच्या घटना देखील या अनुषंगाने घडल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड स्वरुपात झाल्यामुळे दुसरे काही उत्पन्न त्यांच्याकडे उपलब्ध नाही. यात शासनाकडून स्थायी आदेशाप्रमाणे अत्यंत तुटपुंजा व किरकोळ स्वरुपात मदत निधी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याचा तर अजून पत्ताच नाही. अशा परिस्थितीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या सरकारने वीज बिल माफ करून दिलासा देणे अपेक्षित असताना वीज बिल भरण्यासाठी तगादा लावून वीज तोडणी चालू केली आहे.

कोविडच्या काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना एकही रुपयाची मदत केली नाही. केंद्र सरकार कमीत कमी वर्षाकाठी रुपये ६००० तरी शेतकऱ्यांच्या खात्यात उपलब्ध करून देत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वीज तोडणी करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महावसुली सरकारचे चालू आहे असा आरोपही आ. पाटील यांनी केला आहे.

परराज्यात झालेल्या घटनेच्या अनुषंगाने तेथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत राज्यभर शेतकऱ्यांबाबत कळवला असल्याची नौटंकी करणाऱ्या महावसुली ठाकरे सरकारने दुसरीकडे आपल्या राज्यातीलच विविध आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडायची, हा दुटप्पीपणा जनतेने आता ओळखला आहे. त्यामुळे तातडीने वीज तोडणी थांबवून वीज बिल माफी करावी तसेच तोडणी केलेली वीज पूर्ववत चालू करावी यासाठीचे आदेश तत्परतेने व्हावेत अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा महाविकास आघाडी साकारला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.

From around the web