दहा दिवसात हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा आंदोलन

 
s

उस्मानाबाद - शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला तीन व जिल्ह्याला एकूण 24 हरभरा खरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान थांबवावे, अन्यथा येत्या दहा दिवसात हरभरा खरेदी केंद्र चालू न केल्यास या विरोधात लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना बुधवारी (दि.8) दिलेला निवेदनात दिला आहे.

या निवेदनात श्री. दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, उस्मानाबाद मागील दोन वर्षापासून सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच सन 2022 चा खरीप  हंगाम वाया गेलेला आहे. त्यातच सोयाबीन या नगदी पिकाचे बाजारभाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी बेभाव सोयाबीनची विक्री केलेली आहे. यामध्येच खते, बी-बियाणे, डिझेलचे वाढते भाव या आर्थिक वाढीमुळे शेती खर्च दुपटीने वाढलेला आहे. यातच हरभर्‍याचे पीक आले असता बाजारातील हरभर्‍याचे भाव गडगडले असून सध्या बाजारात 4200 ते 4300 रुपये हरभर्‍यास दर मिळत आहे. 

त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला तीन व जिल्ह्याला एकूण 24 हरभरा खरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान थांबवावे, अन्यथा येत्या दहा दिवसात हरभरा खरेदी केंद्र चालू न केल्यास या विरोधात लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील दुधगावकर दिला आहे.

From around the web