प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतिम मुदत 31 जुलै : रविंद्र माने

 
pik vema

धाराशिव  -  खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत www.pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अर्ज घेणे सुरु आहे. 14 जुलै पर्यंत 2 लाख 72 हजार 221 अर्ज ऑनलाईन झालेले असून चालू खरीप हंगामात पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 31 जुलै 2023 आहे. तरी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आत्ताच पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

पीक विमा योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसूचीत पिकांकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आलेला असला तरी 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी प्रती अर्ज केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे तर शेतकरी हिस्स्यातील उर्वरित पीक विमा हप्त्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे किंवा पेरणी करावयाची आहे अशा शेतकऱ्यांनी शासन निर्णयानुसार एक रुपयात विमा अर्ज सादर करावेत. ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरल्या बद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात बारा, 8 अ, उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतिसह नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर मधून किंवा शेतकऱ्यांकडे स्वत:ची सोय असल्यास विमा हप्ता भरुन पीक संरक्षित करावे.

From around the web