उस्मानाबाद जिल्ह्यात 28 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन
 
s

उस्मानाबाद -   मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र यांनी  दि. 24 सप्टेंबरच्या दुपारी 1.00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार आजपासून  28 सप्टेंबर 2021 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.  या कालावधीत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस सुरु असताना शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात जाऊ नये. जिल्हयातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने कोणीही, जलसाठे पाहण्यासाठी, पर्यटनासाठी जाऊ नये. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. नदीपात्राजवळ घरे असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. आपल्या गरजेच्या वस्तू (उदा.औषधी, रोख रक्कम ) स्वतः जवळ बाळगावे. नदीपात्राजवळ आपली मुकी जनावरे बांधू नयेत.मुक्या जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. 

जिल्हयात पावसाची शक्यता असल्याने शेतक-यांनी सोयाबीन काढणी नंतर गंजी झाकणे, पाऊस लागणार नाही अशा जागी पोती ठेवणे इत्यादी दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच नदी, ओढया नाल्याजवळील शेतक-यांनी नदीकाठी किंवा ओढयाकाठी कापणी केलेले सोयाबीन आणि इतर पिकांचे ढीग करु नयेत. नदी,ओढयास पुर आला तर काढून ठेवलेल्या गंजी वाहून जाण्याची शक्यता असल्याने अशा गंजी तात्काळ सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात  याव्यात  आणि  याबाबत   कृषी  विभागाने   देखील  आपल्या  यंत्रणेच्या  माध्यमातून  शेतक-यांना आवश्यक सूचना द्याव्यात. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी, नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. 

दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ,नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरून, नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये.पाउस सुरु असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. स्थानिक पोलीस अधिकारी , तलाठी , मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक, (शहरी भागात न.पा. यांचे अधिकारी) यांच्याशी संपर्कात राहून ते देत असलेल्या सूचनांचे पालन करावे.आपल्या आप्तेष्टांना तसेच गावक-यांना सावधगिरीची सूचना देवून योग्य ती उपाययोजना करावी.
 

From around the web