खरीप 2023 मधील 25% अग्रीम पिक विम्यासाठी सोमवारी बैठक
धाराशिव - जिल्ह्यात मागील 21 दिवसात अधिकांश भागात पाऊस न पडल्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादकतेवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. तीन आठवड्याचा खंड व नजर अंदाजाने 50 % पेक्षा जास्त उत्पादनात घट याचा विचार करून प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत योग्य तरतुदीच्या अनुषंगाने पीक विम्याची 25% अग्रीम रक्कम नियमानुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिल्या असून त्या अनुषंगाने सोमवारी दि. २१/०८/२०२३ रोजी दु. १.३० वा. जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
खरीप २०२१ व २०२२ मध्ये याप्रमाणे २५ % अग्रिम रक्कम मिळवून घेण्यात आपण यशस्वी झालो होतो, त्याच धर्तीवर हि बैठक आयोजित करण्यात आली आहे.पावसामध्ये तीन आठवड्याहून अधिकचा खंड पडून ५० % पेक्षा अधिकचे नुकसान दिसून येत असेल तर २५% अग्रिमची योजनेत तरतूद आहे. जिल्ह्यातील अनेक भागात हा खंड झाल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासमवेत चर्चा करून त्यांना तातडीने बैठक आयोजित करून याबाबत विमा कंपनीला आदेश देण्याच्या सूचना केल्या आहेत. पावसातील खंडामुळे पिकांची परिस्थिती बिकट होत असून शेतकरी चिंतातूर होत आहेत.
त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी २५ % अग्रिम ची मागणी करण्यात आली आहे. सोमवारच्या बैठकीत याबाबत चर्चा होवून पावसातील खंड व पिकांची परीस्थिती विचारात घेवून २५ % अग्रिम देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी प्रक्रिया सुरु करणे अभिप्रेत आहे.शेतकऱ्यांच्या याबाबत काही तक्रारी असल्यास त्या लेखी स्वरुपात बैठकीत द्याव्यात, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.