महापुराचा तडाखा : शेतकरी कंगाल ...
पुणे, मुंबईत राहणाऱ्या उस्मानाबादकरांना 'उस्मानाबाद' आणि येथे 'पूर' ही बातमी आश्चर्यजनक वाटली. पण होय, यंदा परतीच्या पावसाने मांजरा आणि तेरणा नदी कोपली. तिने आपल्या कवेत १२ हुन अधिक गावांना घेतले. अनेकांचे संसार होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले.
कधी कोरडा तर कधी ओला 'दुष्काळ' उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाचवीला पुजला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यात मागील वर्षीचा ( २०२० ) खरीप पीक विमा मिळाला नाही. यंदाही मिळेल की नाही, याची गॅरंटी नाही. पीक विमा कंपनीच्या जाचक अटीमुळे शेतकरी अधिक कंगाल झाला आहे.
जिल्ह्यात यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. नंतर पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्या होत्या. जिल्ह्यात सद्यस्थितीत सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सोयाबीनची उगवण झाल्यानंतर आणि शेंगा लागण्याची वेळ आल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागातील सोयाबीन वाळून गेले. ज्यांचे सोयाबीन वाचले ते ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने वाहून गेले आहे. ज्यांचे सोयाबीन निघाले पण विक्रीला नेत असतानाच भाव गडगडल्याने 'सांगा आम्ही कसे जगायचे' असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
गेल्या १५ दिवसापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर माजवला आहे. विशेषतः उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात सर्वाधिक विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरा आणि तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. तेरणा, निम्न तेरणा, मांजरा ,बोरी, सिनाकोळेगाव आदी धरणे पूर्ण क्षमेतेने भरली आहेत. त्यात सोमवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. तेर, दाऊतपूर, इर्ला,रामवाडी,टाकळी, वाकडी (इस्थळ) सौंदना (आंबा) आदी गावे पुराने वेढली गेली.
तेर हे तीन हजार घरांचे आणि २२ हजार लोकसंख्येचे गाव आहे. १९९७-९८ मध्ये नदीला पूर आल्याने तेर गावात अशा पद्धतीने पाणी शिरले होते. २४ वर्षांनंतर गावात पुन्हा नदीचे पाणी शिरले. तेर, रामवाडी, इर्ला, दाऊतपूर, ढोकी, तुगाव, रुई, दुधगावसह नदीकाठची गावे, वस्ती व शेतात पाणी शिरले.दाऊतपूर येथील सहा, वाकडी ( ई) येथील १७ आणि सौदना आंबा येथील सहा असे २९ जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
जाचक अट रद्द करा
पीक विमा भरलेल्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पिकांच्या नुकसानीच्या सूचना शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance किंवा विमा कंपनीचे Farmmitra हे ॲप डाऊनलोड करुन त्या ॲपव्दारे आपल्या नुकसानीची माहिती द्यावी, तेही ७२ तासाच्या आत अशी अट घालण्यात आली आहे.
पीक विमा कंपनीच्या या जाचक अटीमुळे गतवर्षी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. आता पुरात जाऊन, स्वतःचा जीव घालून शेतकऱ्यांनी शेतात जावे का ? भीक नको पण कुत्रा आवर म्हणण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे.
ही जाचक अट रद्द झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसगट मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधीनी राजकीय अभिनिवेश न आणता सरकार दरबारी आवाज उठविला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार पीक विम्याचा आपला हिस्सा भरत नाही म्हणून विमा कंपन्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम देत नाहीत. प्रशासनाने ३० ऑगस्टला याबाबतची अधिसूचना काढली. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे. मग फसवणूक कोण करत आहे ? विमा कंपन्या की सरकार ?
सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
( हा लेख आपणास कसा वाटला हे आमच्या व्हाट्स अँप वर कळवा - 7387994411 )