कृषी महोत्सव -2023 कृषी क्षेत्राच प्रगतीला चालना देणारा ठरणार
उस्मानाबाद - कृषि महोत्सव-2023 ज्ञान , तंत्रज्ञान माहिती देणारा आणि कृषि क्षेत्राच्या प्रगतीला चालना देणारा ठरणार आहे.सर्वांनी कृषि महोत्सवाला भेटदेवून उस्मानाबाद जिल्ह्याच्या कृषि विकासात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
दि. 10 ते 14 फेब्रुवारी 2023 याकालावधी मध्ये येथील श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल, येथे जिल्ह्याचा श्री.तुळजाभवानी जिल्हा कृषि महोत्सव 2023 जिल्हा प्रशासन व कृषि विभाग यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरण,खते,औषधे,बियाणे,सिंचनाची साधने, सेंद्रिय शेती जिल्ह्यातील कृषिबाबतच्या नाविन्यपूर्ण बाबी,पशुसंवर्धन व दुग्धोत्पादन इत्यादीबाबत जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी व नागरिक यांना माहिती मिळावी या उद्देशाने कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे.
यामध्ये तज्ज्ञ व शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. सोयाबीन लागवड तंत्रज्ञान,कृषि प्रक्रिया,पशुपालन आणि दुग्धोत्पादन,द्राक्ष शेती,ऊस उत्पादन,कृषी यांत्रिकीकरण,शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन अशा विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद,खरीददार-विक्रेता संमेलन,शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान समारंभ ,200 स्टॉलमधून कृषी व गृह उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि उत्पादक ते ग्राहक थेट विक्री दालनाच्या माध्यमातून माफक दरात खरेदी करता येणार आहे.तसेच कृषि विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य दालन, सेंद्रिय दालन व इतर सर्व योजनांचे दालन उभारले जाणार आहे.
तसेच सर्व शासकीय विभागांचे माहिती दालनही उभारले जाणार. याशिवाय सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमामध्ये शुक्रवारी दि. 10 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023 वर आधारीत रांगोळी व पाककला स्पर्धा व कला अविष्कार ग्रुपचा कराओके कार्यक्रम, शनिवारी दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी गुणदर्शन,गायन व नृत्य रविवारी दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी खेळ पैठणीचा सोमवारी दि.13 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राची लोककला मंगळवारी दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बचत गट,शेतकरी गट आणि महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.