खरीप हंगाम 2022 राज्यस्तरीय पिकस्पर्धा निकाल जाहीर

 
X

धाराशिव - राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

राज्यात खरीप हंगाम  2022 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफुल या 11 पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजन करण्यात आली होती. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावरील बक्षीसे देण्यात येतात. खरीप हंगाम 2022 पिकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पिकस्पर्धा निकाल समितीद्वारे जाहीर करण्यात आले.

राज्यस्तरीय खरीप पिकस्पर्धेत भात सर्वसाधारण गटामध्ये शेतकरी नितीन चंद्रकांत गायकवाड यांनी राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. मराठवाड्यातील महिला शेतकरी जयश्री भीमराव डोणगापुरे यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चार पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेतकरी बाजीराव सखाराम खामकर यांनी सोयाबीन सर्वसाधारण गटात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. नांदेडच्या वनिता श्रीराम फोले यांनी सोयाबीन आदिवासी गटात विक्रमी उत्पादन मिळवून प्रथम तर यवतमाळच्या रेखा रमेश कुमरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. शेतकरी प्रल्‍हाद नारायण काळभोर यांनी ज्वारी पिकात तर संभाजी तातोबा खंडागळे यांनी मका पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सात पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. पिकस्पर्धा खरीप हंगाम 2022 मधील सर्व राज्यस्तरीय विजेते शेतकऱ्यांचे कृषी विभागामार्फत कृषी आयुक्त श्री.चव्हाण यांनी अभिनंदन केले.

From around the web