पीक विमा मंजूर न झाल्यास जिल्ह्यात विमा कंपनीचे कार्यालय दिसू देणार नाही - दुधगावकर 

शेतकर्‍यांनी तक्रारी नोंदवूनही विमा कंपनीकडून पंचनाम्यासाठी कासव गती
 
s

उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.पीक विमा कंपनीच्या निकषानुसार अतिवृष्टी झाल्यानंतर 72 तासांत शेतकर्‍यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. अशा स्वरूपाच्या सुमारे 2 लाख तक्रारी विमा कंपन्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र विमा कंपनीकडून केवळ 52 हजार ठिकाणीच पंचनामे झाले आहेत. विमा कंपनीकडून जाणीवपुर्वक कासवगतीने पंचनामे सुरु आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची पिके तोपर्यंत शेतात राहणार का? असा प्रश्न निर्माण होत असून विमा कंपनीकडून विमा मंजूर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. विमा मंजूर न केल्यास जिल्ह्यात विमा कंपनीचे कार्यालय दिसून देणार नाही. असा खणखणीत इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात उस्मानाबाद व कळंब तालुक्यात तेरणा व मांजरा नदी काठच्या जवळपास 1 किलोमीटर अंतरावर शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत आहे. कळंब तालुक्यातील दहिफळ येथील राजकुमार जोगदंड, कृष्णा पाटील, प्रवीण कुटे, मनोज वाघमारे, रघुनाथ मते, प्रल्हाद मते, प्रशांत भातलवंडे, खंडू भातलवंडे, अशोक भातलवंडे, अच्युत मते, गणेश मते, संजय भातलवंडे, बाळासाहेब भातलवंडे, अशोक भातलवंडे आदी शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकात 4 दिवसांपासून पाणी साचले आहे. मात्र महसूल, विमा कंपनीची पंचनामे यंत्रणा पोहोचली नाही. त्यामुळे ही यंत्रणा पोहचेपर्यंत याठिकाणची पिके  नष्ठ होणार आहेत. अशी परिस्थिती जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आहे. 

 विमा कंपनीची यंत्रणा पंचनामे करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचे यावरुन स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पर्जन्यमापकाच्या नोंदीवरून अतिवृष्टी झाल्याचे स्पष्ट झाले असताना मग विमा कंपन्या पंचनामे, जिओ टॅगिंगचे नाटक कशासाठी करते. पिकांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना विमा कंपनीने विमा मंजूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांना विमा मंजूर न झाल्यास जिल्ह्यात विमा कंपनीचे कार्यालय दिसू देणार नाही,असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी विमा कंपनीला दिला आहे.

From around the web