उस्मानाबाद आणि कळंब तालुक्याला महापुराचा तडाखा 

तेर, रामवाडी, ईर्ला, दाऊतपुर, रामवाडी  व सौंदना (आंबा) व वाडीवाकडी गावे जलमय
 
d
हेलिकॉप्टरच्या साह्याने २७ जणांना सुखरूप बाहेर काढले

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हात यंदा विक्रमी पाऊस झाला आहे. विशेषतः उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात पावसाने रौद्ररूप धरण केले आहे. गेल्या १५ दिवसापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे,. सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा आणि मांजरा नदी पात्राचे पाणी दोन किलोमीटर पर्यंत बाहेर पसरले आहे. त्यामुळे उस्मानाबाद तालुक्यातील तेरचा काही भाग, इर्ला, दाऊतपूर, रामवाडी  आदी गावे जलमय झाली आहेत. तसेच उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात २७ जण महापुरात अडकले होते, मात्र त्याना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला  यश आले आहे. 

मागील १५ दिवसापासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने पाण्याने भरली असून ती ओसंडून वाहू लागली आहेत. तर शेतात उभी असलेली व काढणीस आलेली सोयाबीन, मका, उडीद, सूर्यफूल आधीच इतर पिके या सतत कोसळणाऱ्या पावसाच्या तडाख्यात भिजून व जमिनीत पाणी साचल्यामुळे ती जाग्यावरच सडू लागले आहेत.

d

दि.२७ सप्टेंबर रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा नदीकाठी असलेल्या तेर, रामवाडी,दाऊतपुर व इर्ला तर कळंब तालुक्यातील वाडीवाकडी व व सौंदना (आंबा) या गावात पाणी शिरल्याने या गावाचा संपर्क तुटला होता. रात्रीच्या सुमारास घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांना यातून बाहेर कसे निघायचे या संकटाने घेरले. तर अनेकांनी मिळेल त्या मार्गाने पाण्याच्या प्रवाहाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र जे पाण्याच्या बाहेर निघू शकले नाहीत त्यांनी आपला आपल्या परिवारातील चिमुकल्या सदस्यांचा जीव वाचविण्यासाठी घरांच्या छतांचा व झाडांच्या फांदीचा आधार घेतला. रात्रीच्या सुमारास घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांना यातून बाहेर कसे निघायचे हेच न ऊमजल्यामुळे ते या पुराच्या पाराच्या संकटात अडकले. 

८ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग

तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातून ८ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे तेर-मुरुड या रस्त्यावर असलेल्या नदीवरील पूल पूर्ण पाण्याखाली गेला होता. तर तेर आणि पेठ या भागाचा पूर्णपणे संपर्क तुटला गेला. तसेच शेअर मधील नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने घराची प्रचंड मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तर जुने बस स्थानक परिसरातील पस्तीस दुकाने पाण्याखाली गेल्यामुळे दुकानातील सर्व साहित्य भिजवून आर्थिक नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात रुग्ण हलविले

या पुराचे पाणी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात शिरल्यामुळे तेथे उपचार घेत असलेले कोरोनाचे ४ रुग्ण व इतर रुग्णांना उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने आणण्यात आले. तसेच या रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानात पाणी घुसल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना उस्मानाबादला स्थलांतरीत करण्यात आले आहे. 

 झाडावरच चिमुकल्यांनीही काढली रात्र !

पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या नागरिकांनीजीव वाचविण्यासाठी इमारतीचा छंद व झाडाच्या फांद्याचा सहारा घेतला. उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपुर व ईर्ला या गावातील नागरिकांनी रात्रभर छतावर काढली. तर दाऊतपुर येथील ४ पुरुषांनी यासोबत पोटच्या २ लहान चिमुकल्यांना सोबत घेऊन झाडावर चढून रात्रभर कुडकुडत काढली. त्यामुळे वेळ आली होती. पण काळ आला नव्हता या म्हणीचा प्रत्यय आल्याचे दिसून आले.उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथील सहा जण पुराच्या पाण्यात अडकले होते, त्यांना  हेलिकॉप्टरमधून सुखरुप सुटका  करण्यात आली. 

 ज्या ठिकाणी नागरिक पुराने वेढलेल्या गावात अडकलेले आहेत. तेथून त्यांना पाण्यातून सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून ३ बोटींची व्यवस्था करण्यात आली होती. या बोटीच्या सहाय्याने कळंब तालुक्यातील वाडी वाकडी येथील २० व सौंदना (आंबा) येथील ६ जणांना तर उस्मानाबाद तालुक्यातील तेर, रामवाडी, ईर्ला व दाऊतपुर येथील २५० व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

तळेगाव येथून मागविली एनडीआरएफची टीम

जिल्ह्यातील पूर परिस्थिती अत्यंत भयावह व गंभीर निर्माण झाल्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अर्थात एनडीआरएफची मदत घेण्यात आली. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील २ मदत पथकांचे जवानांचे दल आपल्या ताफ्यासह दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद येथे दाखल झाली. या या जवानांच्या माध्यमातून दाऊतपूर, ईर्लासह इतर ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्याचे मोहीम हाती घेण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी धावले मदतीला 

अडीअडचणीच्या काळात व आपत्तीच्या मिळेल कोणतेही पक्षीय कारण न सांगता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपत्ती उद्भवलेल्या ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी धावून गेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणांना याबाबत अवगत करीत मदतीसाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्याचे सुचित केले. यामध्ये माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे आदी सह इतर लोकप्रतिनिधींनी लोकांना आवश्यक ती मदत करण्यासह प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करीत जनतेला धीर देण्याचे काम केले.

 हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांना काढले बाहेर 

जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रस्ते चिखलमय झाल्याने वाहने नेण्यास अडचणी येत होत्या. ही बाब हेरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनी वर उद्भवलेल्या आपत्ती बाबत सर्व माहिती अवगत केली. तसेच नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर पाठविण्याची मागणी केली. त्यावर अजित पवार यांनी देखील हेलिकॉप्टरची व्यवस्था तात्काळ करून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्देशित केले. सकाळपासून वातावरण खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर उशिरा जिल्ह्यात दाखल झाले. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

वाकडी_ई येथील पुरात अडकलेल्या १७ नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश

दि.२७ सप्टेंबर रोजीच्या रात्रीच्या पावसाने मांजरा नदी पात्राचे अचानक पाणी वाढल्याने #कळंब तालुक्यातील #वाकडी_ई गावांत पाणी शिरल्याने या पुराच्या पाण्यात गावातील १७ नागरिक अडकले होते. 

 आ.कैलास घाडगे-पाटील यांच्यासह गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस, महसूल प्रशासनास पाण्यात अडकलेले नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.  नागरिकांशी संवाद साधून त्यांना धिर दिला.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ-होळ मॅडम, तेरणा स.सा.का.व्हाईस चेअरमन बाळासाहेब माकोडे, जि.प.सदस्य बालाजी बप्पा जाधवर, बोरगावचे सरपंच अजय समुद्रे, गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते.

सरासरीपेक्षा १३६. ७८ टक्के पाऊस

d

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान‌ ७६७.७ मि.मि. आहे. मात्र दि.२७ सप्टेंबरपर्यंत ८२४.९० मि.मि. पाऊस झाला असून सरासरीच्या १३६.७८ टक्के पाऊस झाला आहे.  आवश्यक असलेला पाऊस व झालेला पाऊस तसेच टक्केवारी तालुकानिहाय पुढील प्रमाणे - उस्मानाबाद- ६३६.६० - ७८६.९० - १२३.६१ टक्के, तुळजापूर- ६५३.०० - ८४७.१० - १२९.७२ टक्के, परंडा- ४७२.५ - ७५७.१० - १६०.२३ टक्के, भूम- ५८०.६ - ९६१.०० - १६५.२२ टक्के, कळंब- ६३०.०० - ७६३.९० - १२१.२५ टक्के, उमरगा- ५६५.५ - ८६४.७० - १५२.९१ टक्के, लोहारा- ५४४.१ - ७२५.७० - १३३.३८ टक्के व वाशी- ६४१.२ - ९२५.२० - १४४.२९ टक्के असा एकूण १३६.७७ टक्के पाऊस झाला आहे.


४२ महसूल मंडळापैकी ३५ मंडळात अतिवृष्टी 

जिल्ह्यात ४२ महसूल मंडळ असून त्यापैकी ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी झालेली मंडळे तालुकानिहाय पुढील प्रमाणे - उस्मानाबाद - उस्मानाबाद ग्रामीण, बेंबळी, पाडोळी (आ), केशेगाव, ढोकी, जागजी व तेर तर तुळजापूर - सलगरा, मंगरूळ, ईटकळ, जळकोट व नळदुर्ग तसेच परंडा - परंडा, आसू, जवळा, आनाळा व सोनारी तर भूम - अंभी, माणकेश्वर, भूम व लेट तर कळंब - येरमाळा, मोहा, शिराढोन व गोविंदपुर तसेच उमरगा - उमरगा, डाळिंब, नारंगवाडी, मुळज व मुरूम तर लोहारा - लोहारा व माकणी तसेच वाशी - पारगाव व तेरखेडा या ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

शेतात, पिकात अन् डोळ्यातही पाणी !

संपूर्ण जग कोरोना विषाणूंचा मुकाबला करीत असताना या जनतेला जगविण्याचे काम जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेला बळीराजा करीत आहे. या संकटात देखील शेतकरी काबाडकष्ट करून काळ्या आईची सेवा करीत आहे. यंदा सोयाबीन सुरुवातीपासूनच चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर पूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजनाचे स्वप्न रंगविले होते. मात्र अतिवृष्टीमुळे हाती तोंडी आलेला पिकाचा घास डोळ्यादेखत पाण्यात सडू लागल्यामुळे शेतकरी प्रचंड धास्तावला आहे. एकीकडे जिकडे पाहावे तिकडे शेतात पाणीच पाणी दिसू लागले आहे. तर दुसरीकडे उभी असलेली पिके पाण्यात सडत असल्यामुळे प्रचंड नैराश्य निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणीच तरळू लागल्याचे अतिशय दुःखद चित्र जिल्हाभरात पहावयास मिळू लागले आहे.

From around the web