शेतकर्‍यांनी अधिक नफ्यासाठी आधुनिक पीक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करावा - तीर्थकर

भुसणी येथे  जागतिक मृदा दिवस मोठ्या उत्साहात 
 
sd

उमरगा  - जमिनीची वाढती धूप, मातीचा कर्ब व शेती न करता शेतीला देखील आपण एका व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करून अधिक नफा कशा पद्धतीने घेता येईल ? यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक महेश तीर्थकर यांनी केले.

उमरगा तालुक्यातील मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर व कृषी विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उस्मानाबादचे उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भगवान अरबाड, प्रा. अपेक्षा कसबे, जिल्हा मृद चाचणी अधिकारी दीपक दहिफळे, उमरगा व लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग व मंडळ कृषी अधिकारी अभिजीत पटवारी आदी उपस्थित होते. 

यावेळी उमेश बिराजदार म्हणाले की,  महाडीबिटी व इतर योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी वर्गाने घेतला पाहिजे. विभागून शेती न करता गट शेती करण्यासाठी आता शेतकऱ्यांनी एकत्रित येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. तर माती परीक्षणाचे फायदे व जमिनीला लागणाऱ्या अन्न घटकांची संतुलित मात्रा देण्याचे अवाहान दीपक दहिफळे यांनी केले. तसेच पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये असणारे मातीचे महत्त्व, उसाच्या पाचट कुट्टीचे उत्पादनामध्ये होणारे फायदे याविषयी भगवान अरबाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. 

 वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम तूर व हरभरा पिकावर दिसून येत असून मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे. या रोगाचा शिरकाव बुरशीमुळे होतो व त्या बुरशीला नियंत्रण करण्यासाठी बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. तसेच पारंपरिक वाण न वापरता आधुनिक वाणाची निवड शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन प्रा.अपेक्षा कसबे यांनी केले. यावेळी ज्वारी पिकांवर येणाऱ्या लष्करी अळी व उन्हाळी सोयाबीन लागवडी बाबत सविस्तर मार्गदर्शन मिलिंद बिडबाग यांनी केले.तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक शेती न करता किमान आपल्या कुटुंबासाठी सेंद्रिय शेती करावी व सेंद्रिय शेतीचे आपल्या आरोग्याशी असलेले महत्व याविषयी अभिजित पटवारी उपस्थितांना उदाहरणासह पटवून दिले. 

या कार्यक्रमास भुसणीचे सरपंच महेश हिरमुखे, जिल्हा परिषद सदस्य धनराज हिरमुखे, साहेबन्ना हिरमुखे, श्रीमंत पाटील, सुभाष बिराजदार, शशिकांत व्हनाजे, उमाकांत बिराजदार, सचिन बिराजदार, मोशिन मुगळे, अजित पाटील बालाजी संगसट्टे, योगेश स्वामी, मुकेश व्हनाजे, आर.एस. पाटील कृषी सहाय्यक भूसणी  व आदी शेतकरी उपस्थित होते.

गट शेती ही काळाची गरज आहे असे आवाहन स्वामी चिदानंद यांनी केले. तर गावातील सर्व युवक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करण्यावर भर द्यावा असे आवाहन सरपंच महेश हिरमुखे यांनी केले. तसेच शेतकऱ्यांनी पारंपारिक वाण न वापरता आधुनिक वाणाची निवड करुन उत्पादनात वाढ करावी असे आवाहन तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले.

From around the web