शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब करुन उत्पन्न वाढवावे

  -   अपर मुख्य सचिव नंदकुमार
 
d

उस्मानाबाद - पाण्याचे अपव्यय टाळून आणि ठिबक सिंचनाचा वापर करुन शेती करणारा प्रत्येक शेतकरी लखपती बनू शकतो. ठिबक लावल्याने प्रती एकर 30 ते 40 टक्के उत्पन्नात वाढ होणे शक्य आहे ,  असे प्रतिपादन रोहयो , मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी आज येथे केले.                        

 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जलसंधारण आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत  ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि प चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश बिराजदार, राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे, राज्य प्रकल्प अधिकारी श्रीमती सायली घाणे आणि जिल्हा परिषद व महसूल विभागातील विभागप्रमुख उपस्थित होते.

पाण्याच्या प्रत्येक थेंबातून आणि मातीच्या प्रत्येक कणातून उत्पन्न वाढवणे शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी समृध्द व्हावे ही आपली प्रथम प्राथमिकता असली तरच समृध्द शेतकरी हा समृध्द महाराष्ट्राचा पाया रचेल. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याच्या उध्दारासाठी शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे असे निर्देश श्री.नंदकुमार यांनी यावेळी दिले.

शेतीतील उत्पन्नात वाढ करण्यासाठी पाण्याचे अपव्यय टाळणे ही काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर शेतीसोबत इतर जोडधंद्यांबाबतही शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे अपेक्षित आहे, असेही श्री. नंदकुमार यावेळी म्हणाले.

उस्मानाबाद जिल्ह्याचा झपाट्याने विकास करण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या समन्वयाने काम करावे. रोजगार हमी योजनेबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. मोठ्या संख्येने जॉब कार्ड उपलब्ध करुन द्यावे तसेच प्रत्येक गावामागे पाच कामे सेल्फ वर ठेवा. म्हणजे मागेल त्याला काम या संकल्पनेचा अवलंब करणे अधिकाधिक सोपे होईल. सेल्फच्या (Self) माध्यमातून पाच कामांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असलेल्या कामांमुळे काम मागणाऱ्याला लवकर काम सुरु करण्यास मदत मिळते.

जलसंधारण विभागाने पूर्ण क्षमतेने काम केल्यास जिल्ह्यात पडणाऱ्या सरासरी 70 सें.मी. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न सुटतील असेही श्री.नंदकुमार यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 622 ग्राम पंचायतीतील माहिती दिली . ते म्हणाले की, जिल्ह्यात एकूण मंजुरांची संख्या 6 लाख 52 हजार आहे . त्यापैकी 2 लाख 91 हजार मजुरांना जॉबकार्ड देण्यात आले आहे तर 59 हजार मजूर कामांवर आहेत. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 54 हजार 882 योजनेच्या सुरुवातीपासून आहेत. 39 हजार 560 कामे पूर्ण झाली असून 15 हजार 322 कामे अपूर्ण आहेत. पूर्ण कामांची टक्केवारी 72.8 टक्के असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .चंदनशिवे यांनी केले तर आभार जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक विलास खिल्लारे यांनी मानले.

From around the web