पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अजूनही अनुदान नाही मग  मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केव्हा मिळणार ? 

राज्य सरकार नुसतं बोलणार का काही देवूनही दाखवणार ?
 
dx
- आ. राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद  - पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जुलै मध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान ६० दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा राज्य सरकारकडून मिळालेले नाही व नुसते बोलण्यापेक्षा राज्य सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काही देणार आहेत का ? व कधी ? असा सवाल आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना केला.

उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हाहाकार माजविला असून अनेक गावात अभूतपूर्व अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थितीमुळे या भागातील सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होवून मालमत्ता, घरांची पडझड, जनावरे, शेळ्या-मेंढ्या, गोठा, गावातील छोटे व्यावसायिक तसेच शेतीतील औजारे व इतरही साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते. लहान-मोठे रस्ते, पूल, बंधारे वाहून गेले आहेत तर वीज वितरण व्यवस्थेचं देखील मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खास करून काढणीला आलेले व काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. तोडणीला आलेले ऊसा सारखे नगदी पिक देखील आडवे झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात काही मंत्री पाहणीसाठी येऊन गेले, त्यांनी एका महिन्यात मदत देवू म्हणून सांगितले.

कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जुलै, २०२१ मध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक कुटुंबे बाधित झाली व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर शासनाच्या नुकसान भरपाई देण्याबाबत घोषणा झाल्या, शासन निर्णय काढण्यात आले. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी अजूनही काहींच पडले नाही, त्यांची घोर निराशाच झाली आहे. तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत झालेल्या बोलण्यावरून शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी निधी अथवा मदत मिळाली नसून अद्याप ते वंचितच असल्याचे समजते.

त्यामुळे आता मराठवाड्यावर आलेल्या संकट काळी हे सरकार काय व कधी मदत करणार ? असा प्रश्न नुकसानग्रस्त नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. त्यातच खरीप २०२० चा विमा मिळणे अजूनही बाकीच आहे. राज्य सरकारने आता नुसतं बोलण्या पेक्षा जे काही द्यायचे आहे ते किती व कधी हे तातडीने स्पष्ट करावे अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.

From around the web